Ram Mandir Donation Theft Case : राममंदिर देणगी चोरी प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर तुरुंगात असलेल्या आठही आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आरोपींचे जबाब पुन्हा नोंदवण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षकांनी विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) रजत वर्मा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे.
तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली रोकड, नाणी, दागिने आणि इतर साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या तपासाचा अहवाल आता पोलिसांना प्राप्त झाला आहे.
फॉरेन्सिक अहवालातील माहितीबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, हा अहवाल आरोपींविरुद्ध अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे मानले जात आहे. आरोपींच्या नव्या जबाबांमुळे तपासाला नवी दिशा मिळून आणखी नवे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.याआधीही आरोपींना न्यायालयात मोठा झटका बसला होता. चुकीच्या कलमांखाली झालेली अटक, रिमांड आणि जप्तीवर प्रश्न उपस्थित करत आरोपींनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.
सध्या सर्व आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सर्वांच्या जामीन अर्जांवर विशेष न्यायाधीश (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) रजत वर्मा यांच्यासमोर सुनावणी प्रलंबित आहे.