Rajnath Singh - Pm Narendra Modi Pudhari Photo
राष्ट्रीय

Rajnath Singh | येणाऱ्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधानपदासाठी जागा रिक्‍त नाही : राजनाथ सिंह

२०४७ मध्ये विकसित भारत होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करणार

पुढारी वृत्तसेवा

Rajnath Singh said the Prime Minister’s post has no vacancy for many years to come

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २०४७ मध्ये विकसित भारत होईपर्यंत देशाचे नेतृत्व करतील, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. एका मुलाखतीमध्ये २०२९ मध्ये भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता. राजनाथ सिंह म्हणाले की, २०२९, २०३४,२०३९,२०४४ आणि २०४७ मध्ये विकसित भारत होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चेहरा असतील. राजनाथ सिंह म्हणाले की, सध्या आणि येणाऱ्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधानपदाची जागा रिक्त नाही, कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी येत्या अनेक वर्षांसाठी पंतप्रधान राहतील. ते निर्विवाद आहेत आणि ते तसेच राहतील. येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाची जागा रिक्त राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींशी असलेल्या त्यांच्या संबंधांवरही चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींशी त्यांचे जवळजवळ ३५ वर्षांपासूनचे संबंध आहेत. आम्ही पहिल्यांदा झाशीमध्ये भेटलो होतो. तेव्हापासून आणि आजपर्यंत अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषतः पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अनेक जटिल निर्णय घेतले आहेत, जे कोणीही घेण्याचा विचार करणार नाही. ते सर्वात मोठ्या आव्हानांना तोंड देऊनही मागेपुढे पाहत नाहीत. ही त्यांची क्षमता आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

जगातील अनेक प्रमुख नेते जागतिक घडामोडींवर नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतात. मी कधीही इतर कोणत्याही पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जागतिक नेत्यांकडून इतके वैयक्तिक फोन आलेले पाहिलेले नाहीत, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी हे देखील सांगितले की भाजपने २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना प्रचार समन्वयक म्हणून नियुक्त केले आणि नंतर संसदीय मंडळाच्या पाठिंब्याने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नियुक्त केले. ते म्हणाले की ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा कोणताही अनादर झाला नाही; त्यांचा अजूनही खूप आदर केला जातो आणि तो तसाच राहील. तथापि, देशाने मोदींच्या नेतृत्वाची मागणी केली, असे राजनाथ सिंह म्हणाले.

२०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान, आम्ही अनेकदा एकत्र प्रवास केला. मी नरेंद्र मोदी यांना सांगितले होते की त्यांना पूर्ण बहुमत मिळेल, परंतु त्यांना स्वतःला यावर पूर्ण विश्वास नव्हता, असे राजनाथ सिंह म्हणाले. मत चोरीचे विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे म्हणून त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, जर विरोधकांकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT