High Court Drinking on Water Supply :पाण्याच्या पुरवठ्याला इतर सर्व वापरांपेक्षा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण राजस्थान उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच राज्य सरकारला राजसमंद सरोवरात पुरेसा पाणीसाठा राखून ठेवण्याचे निर्देशही न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर आणि न्यायमूर्ती संदीप शाह यांच्या खंडपीठाने दिले.
'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाच्या २०१० मधील एका आदेशानुसार, राजस्थानमधील राजसमंद तलावातील पाण्याची उपलब्धता तपासण्यासाठी आणि कोणतीही टंचाई निर्माण होऊ न देता पिण्याच्या पाण्यासाठी किती पाणी राखीव ठेवावे हे निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्य सरकारने राजसमंदच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेबाबत वेगवेगळी भूमिका घेतली, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला होता.
पिण्याच्या पाण्यासाठी राजसमंद तलावात पुरेसा पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. यावर न्यायमूर्ती विनीत कुमार माथूर आणि न्यायमूर्ती संदीप शाह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. काळाच्या ओघात नळ जोडण्यांची संख्या वाढली असून, यंदा या भागात अपुरा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे सिंचन आणि इतर वापरांपेक्षा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.
दुसरीकडे, राज्य सरकारच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देत सांगितले की, प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या गरजेबाबत गंभीर असून इतर सर्व वापरांपेक्षा पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य देण्याची गरज ओळखून आहे. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन तलावात पुरेसा पाणीसाठा राखीव ठेवला जाईल, अशी ग्वाही सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि सरकारचे प्रतिज्ञापत्र तपासल्यानंतर खंडपीठाने म्हटले की, "प्रतिज्ञापत्रावरून हे स्पष्ट होते की, सक्षम अधिकाऱ्यांनी राजसमंद तलावातील पाण्याची उपलब्धता आणि जिल्ह्याला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे आवश्यक मूल्यांकन केले आहे. प्रतिवादींनी पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशी पातळी राखून पाणी राखीव ठेवले आहे. या परिस्थितीत, याचिकाकर्त्याने या जनहित याचिकेद्वारे मांडलेली समस्या आणि चिंता यांची प्रशासनाने आधीच दखल घेतली असल्याचे आमचे मत आहे. राजसमंदसह कोणत्याही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला इतर सर्व वापरांपेक्षा प्राधान्य दिलेच पाहिजे, यावर न्यायालयाने विशेष भर दिला. अपुऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन राजसमंदच्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी तलावातील पाण्याची योग्य पातळी राखण्याच्या निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला देत ही जनहित याचिका निकाली काढली.