INDIA Alliance Meeting : 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. नवी दिल्लीतील अनेक प्रमुख चौकांमध्ये (गोलचक्कर) काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य करणारे पोस्टर्स लावण्यात आल्याचे समोर आले आहे.
या पोस्टर्सवर 'इंडिया' आघाडीतीलच प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर वेगवेगळ्या वेळी केलेली टीका आणि विधाने छापण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन आणि आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या जुन्या विधानांचा समावेश आहे. विरोधकांच्या या बैठकीच्या काही तास आधीच हे पोस्टर्स लागल्याने दिल्लीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी, म्हणजेच १ जून २०२४ रोजी 'इंडिया' आघाडीची शेवटची अधिकृत बैठक नवी दिल्लीत झाली होती. त्यानंतर आता सोमवारी (आज) ही बैठक होत आहे. नुकत्याच झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या धक्क्यांनंतर, आघाडीची पुढील दिशा ठरवण्यासाठी सुमारे २३ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत एकत्र येत आहेत.
या बैठकीला “जनबंधन” असे नाव देण्यात आले असून, आघाडीसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२९ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भविष्यातील रणनीतीवर यात चर्चा होणार आहे. घटक पक्षांमधील समन्वय वाढवणे, भाजपविरोधात एकत्र लढणे आणि अंतर्गत मतभेद मिटवणे या मुद्द्यांवर बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाण्याची शक्यता आहे.
कॉन्स्टिट्युशन क्लब येथे होणाऱ्या या बैठकीला काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) तेजस्वी यादव, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह डावे पक्ष आणि इतर लहान पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.