

Umar Abdullah on 'Vote chori' issue
श्रीनगर : काँग्रेस पक्षाने रविवारी (दि. १४ डिसेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘वोट चोर गद्दी छोड’ आंदोलन केले. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. मात्र, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या या आरोपांपासून स्वतःला स्पष्टपणे वेगळे ठेवले आहे. या मुद्द्याचा INDIA आघाडीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
उमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष हा विरोधी INDIA आघाडीचा घटक असून, लोकसभेतील खासदारांच्या संख्येनुसार काँग्रेस हा या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसच्या ‘मतचोरी’ मोहिमेबाबत आणि निवडणुकीतील कथित अनियमिततांवरील आरोपांबाबत विचारले असता उमर अब्दुल्ला म्हणाले, “INDIA आघाडीचा याच्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःचा अजेंडा ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. काँग्रेसने ‘मतचोरी’ आणि SIR हा आपला मुख्य मुद्दा केला आहे. आम्ही त्यांना वेगळे काही सांगणारे कोण आहोत?”
काँग्रेसने दावा केला आहे की कथित ‘मतचोरी’विरोधात त्यांनी सुमारे सहा कोटी स्वाक्षऱ्या गोळा केल्या असून त्या भारताच्या राष्ट्रपतींकडे सादर करण्याची त्यांची योजना आहे. याआधी बिहार विधानसभा निवडणुकांच्या काळात विशेष सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया सुरू असताना, उमर अब्दुल्ला यांनी बिहारमधील जनतेत निवडणूक आयोगाबाबत नाराजी असल्याचा दावा केला होता. निवडणूक आयोगाने आपल्या स्वायत्तता आणि निष्पक्षतेच्या मूल्यांवर खरे उतरले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले होते.
बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल (RJD) नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव झाला. यावर प्रतिक्रिया देताना उमर अब्दुल्ला म्हणाले की, हा निकाल त्यांच्या पक्षाच्या बडगाम पोटनिवडणुकीतील पराभवापेक्षाही अधिक धक्कादायक होता. नीतीश कुमार यांनी सत्ताविरोधी वातावरण सत्तासमर्थक वातावरणात रूपांतरित केले. काँग्रेसने ‘मतचोरी’ मोहिमेच्या उत्साहात INDIA आघाडीतील भागीदारांमधील जागावाटप अधिकच कठीण केले आहे.”