राष्ट्रीय

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या लोकसभेतील पक्षनेतेपदी निवड

मोहन कारंडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस कार्यकारी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेतील काॅंग्रेसच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारी समितीने पारित केलेल्या प्रस्तावानुसार नेतेपद स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आपल्याला थोडा अवधी मिळावा, अशी विनंती राहुल गांधी यांनी पक्षाकडे केली आहे. कार्यकारी समितीच्या आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने चांगली कामगिरी बजावल्याबाबत चर्चा करण्यात आली.

काँग्रेसच्या निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे लवकरच एक समिती गठित करणार असून ही समिती लोकसभा निवडणुकीचा राज्यनिहाय आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांकडे सोपविणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी दिली.

काँग्रेस पक्ष आता पुनर्जिवीत झाला ही पक्षासाठी समाधानाची बाब असली तरीही देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठकीत बोलताना म्हटले. जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना २४ तास आणि वर्षातील ३६५ दिवस सक्रीय रहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशासाठी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. उत्तरप्रदेशात भाजपला रोखण्यासाठी प्रियांका गांधी वधेरा यांनी राबविलेल्या प्रचार मोहीमेची प्रशंसा बैठकीत करण्यात आली. काॅंग्रेसला यश मिळवून देण्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह वचननाम्यातील कांग्रेसच्या ५ न्याय आणि २५ गॅंरटी कार्यक्रमाबाबतही बैठकीत चर्चा झाली.

रायबरेली की वायनाड, राहुल गांधींचा आज,उद्या निर्णय

राहुल गांधी केरळच्या वायनाड आणि उत्तरप्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून विजयी झाल्यामुळे या दोनपैकी कुठल्या जागेचा राजीनामा द्यायचा, याबाबत ते पुढील दोन दिवसांत निर्णय घेतील, अशी माहिती के. सी. वेणूगोपाल यांनी दिली.

महाराष्ट्र व उत्तरप्रदेशच्या कामगिरीवर काँग्रेस खुश

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशने चांगली कामगिरी बजावल्याबद्दल काँग्रेसच्या गोटात आनंद आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत दोन्ही राज्यातील नेते व पदाधिकाऱ्यांचे कौतूक करण्यात आले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT