‘इंडिया’ आघाडीने नितीश कुमारांना दिली होती पंतप्रधानपदाची ऑफर : जेडीयू नेत्‍याचा दावा

नितीश कुमार ( संग्रहित छायाचित्र )
नितीश कुमार ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे.देशात पुन्‍हा एकदा भाजप प्रणित एनडीए आघाडीचे सरकार स्‍थापन होणार आहे. मात्र सरकार स्‍थापन करण्‍यासाठी भाजप विरोधी इंडिया आघाडीनेही प्रयत्‍न केले होते. त्‍यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्‍त) (जेडीयू)चे प्रमुख नितीश कुमार यांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा जनता दल संयुक्‍त ( जेडीयू)चे नेते के. सी. त्‍यागी यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्‍या मुलाखतीत केला आहे.

भाजप प्रणित एनडीएने ५४३ पैकी २९३ जागा जिंकल्‍या आहेत. तेलगू देसम पार्टीचे एन. चंद्राबाबू नायडू आणि JD(U) चे नितीश कुमार यांसारख्या मित्रपक्षांनी युतीला बहुमताचा आकडा पार करण्यास मदत केली. विरोधी इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली होती. त्‍यामुळे या आघाडीने सरकार स्‍थापन्‍यासाठी प्रयत्‍न केले होते, असा दावा त्‍यागी यांनी केला आहे.

नितीश कुमारांनी पंतप्रधान पदाची ऑफर नाकारली

के. सी. त्‍यागी यांनी म्‍हटलं आहे की, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांना आघाडीत आणण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष इंडिया गटाने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. नितीश कुमारांना इंडिया आघाडीचे संयोजक होण्‍यास विरोध केला होता अशाच लोकांनी त्‍यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली, असेही त्‍यांनी सांगितले. मात्र नितीश कुमार यांना कोणत्या नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, या प्रश्‍नावर त्‍यांनी मौन बाळगणे पसंद केले.

आम्‍ही 'एनडीए'सोबत

नितीश कुमारांनी इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधान पदाची ऑफर नाकारली आहे.आम्ही एनडीएमध्ये सामील झालो आहोत आणि आता मागे वळून पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्‍ही भाजप प्रणित एनडीए सोबतच आहोत, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी यावेळी केला.
भाजपविरोधी इंडिया आघाडी स्‍थापना करण्‍यात नितीश कुमार हेच शिल्‍पकार होते. त्‍यांनी मागील वर्षी बिहारची राजधानी पाटणा येथे इंडिया आघाडीच्‍या पहिल्‍या बैठकीचे आयोजन त्‍यांनी केले होते. या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ते होते. मात्र जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार यांनी पुन्‍हा भाजप प्रणित एनडीएशी हातमिळवणी केली.

नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्‍या जेडीयूने १२ मतदारसंघात विजय मिळवला आहे. नितीश कुमार यांनी आपल्‍या राजकीय कारकीर्दीत अनेक वेळा यू-टर्न घेतले आहेत. 2013 मध्ये त्यांनी भाजपशी संबंध तोडून राष्‍ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती;पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी 2020 मध्ये पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री बनले. दोन वर्षांनंतर त्यांनी भाजपशी संबंध तोडून राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्‍यांनी जानेवारी २०२४ मध्‍ये पुन्हा भाजपबरोबर हातमिळवणी करत मुख्‍यमंत्रीपदी कायम ठेवले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news