Rahul Gandhi Jyotiraditya Scindia Friendship: राहुल गांधी हे तरूण काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबतच्या मैत्रीवरून चिमटा काढला. कधी काळी ज्योतिरादित्य हे राहुल गांधी यांचे अत्यंत चांगले मित्र म्हणून संबोधले जात होते. मात्र त्यांनी २०२० मध्ये पक्षाला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये गेले अन् आता ते केंद्रीय मंत्री आहेत. खरगेंच्या या टोमण्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी त्यांच्या आजीचे अर्थात इंदिरा गांधींचे उदाहरण दिले.
राहुल गांधी हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना गेल्या काही वर्षात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून गेले. जे सोडून गेले ते भीत्रे आणि लालची असल्याचा आरोप त्यांनी केला. आता पक्षात फक्त सिंह राहिले आहेत. त्यावेळी त्या नेत्यांमध्ये तुमचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे देखील होते असा चिमटा खरगे यांनी राहुल गांधी यांना काढला. त्यावेळी राहुल गांधी यांनी खरगे यांना याचे उत्तर आपल्या आजीचे उदाहरण देत दिलं.
राहुल गांधी म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे हे माझे मित्र नव्हते हे माझी बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांना माहिती आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे राजकीय नाते कसे असते याचे उदाहारण दिलं.
राहुल गांधी म्हणाले की, माझे राजकारणाचे ट्रेनिंग हे माझ्या आजीपासून सुरू झालं आहे. एकदा मी विचारलं की तुझा सर्वात चांगला मित्र कोणता. त्यावेळी तिने मला बेस्ट फ्रेंड नाही असं सांगितलं. मी तिला आमच्या घरी सतत भेटी देणाऱ्या एका महिलेबाबत विचारले अन् ती तुझी चांगली मैत्रिण नाही का असं विचारलं. त्यावेळी ती म्हणाली की मी तिची बेस्ट फ्रेंड असू शकतो. मात्र ती माझी बेस्ट फ्रेंड नाही.'
राहुल यातून शिकवण घेतल्याचं सांगत खरगेंकडे वळून म्हणाले, 'मी एक राजकीय व्यक्ती आहे. त्यामुळं तुम्हाला काहीजण माझे मित्र वाटतील. मात्र तसं नसेल. कोणी माझा चांगला मित्र वाटू शकतो मात्र तो माझा चांगला मित्र असेलच असं नाही. तर कोणी माझा कट्टर दुष्मन वाटू शकतो. मात्र वस्तुस्थितीत तो माझा खरा दुष्मन नसेलच. कोण चांगला मित्र हे शोधणे नक्कीच कठिण आहे.'
ज्योतिरादित्य शिंदे यांनी २०२० मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. कधी काळी ते राहुल गांधी यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणून ओळखले जात होते.