Rahul Gandhi Sonam Wangchuk Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi: सोनम वांगचुक प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; 'कोणतीही ताकद विद्यार्थ्यांचा आवाज दाबू शकत नाही'

Rahul Gandhi Sonam Wangchuk: जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi Sonam Wangchuk: जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या कारवाईवर तीव्र टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, "मोदी सरकारचे प्रमुख तत्त्व असत्य आणि हिंसा आहे. सोनम वांगचुक यांना ते शांततापूर्ण उपोषण करत असताना जंतर-मंतरवरून हटवणे चुकीचे आहे."

विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, "पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारखे प्रश्न भारताच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर आहेत. भारतातील विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या लोकांना हे प्रश्न मांडण्यापासून कोणतीही ताकद रोखू शकत नाही."

21 व्या दिवशी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

18 जुलै रोजी आमरण उपोषणाच्या 21 व्या दिवशी सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार करण्यात आली. दीर्घकाळ उपोषण आणि शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

रुग्णालय परिसरात कडक सुरक्षा

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सफदरजंग रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाची पण व्यवस्था करण्यात आली आहे, गर्दीच्या नियंत्रणासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, केंद्र सरकारच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी ही कारवाई केवळ वैद्यकीय कारणांमुळे आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT