Rahul Gandhi Parliament membership: संसदेत सध्या २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, सरकार आणि विरोधकांमध्ये अनेकवेळा गोंधळ निर्माण झाला आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी एप्स्टिन फाईल, भारत - चीन घडामोडींवरून जोरदार टीका केली होती. त्यांनी पंतप्रधानांनी देश विकला असा खळबळजनक दावा देखील केला होता.
त्यानंतर आता भाजप खासदारांनी राहुल गांधी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत तशी हक्कभंगाची नोटीस संसदेत दिली आहे. भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्याविरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. राहुल गांधी यांनी काल भारत - युएस ट्रेड डील आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत भाषण केलं होतं. त्यानंतर भाजप खासदारांनी हे पाऊल उचललं आहे.
बुधावारी संसदेत केलेल्या बाषणात राहुल गांधी यांनी भूराजकीय वाद, AI, अमेरिकेसोबतचा व्यापार करार याबाबत भाष्य केलं होतं. अनेक दिवस विरोधी पक्ष त्यांना संसदेत बोलण्याची संधी दिली जात नाही म्हणून आंदोलन करत होते. राहुल गांधी यांनी संसदेत निवृत्त लष्कर प्रमुख नरवणे यांच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवला होता. त्याला सरकारनं आक्षेप घेतला होता.
दरम्यान, राहुल गांधी तसेच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकहितविरोधी कलमांचा विरोध करणार असल्याचं जाहीर केलं असून त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं. त्यांनी आज देखील मकर द्वार इथं आंदोलन सुरू केलं आहे.
संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेश २८ जानेवारीपासून सुरू झालं आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी दोन्ही सभागृह ही स्थगित होणार असून या अधिवेशनाचा दुसरा भाग हा ९ मार्चपासून सुरू होणार आहे.