नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवरून पुन्हा एकदा 'मतचोरी'चा मुद्दा उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना त्यांनी भारताच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि मतचोरी होत असून, त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी या संवाद सत्रात केला.
या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी मतदार यादीतील त्रुटींकडे लक्ष वेधताना दावा केला की, तब्बल १४ कोटी मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यासोबतच त्यांनी निवडणुकीतील वाढत्या खर्चावरही तीव्र चिंता व्यक्त केली. पूर्वीच्या तुलनेत आता भारतीय निवडणुकांमध्ये २० ते ५० पटीने अधिक पैसा खर्च केला जात असून हा अफाट पैसा नेमका कोठून येतो, याची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीची पाच वर्षे इतका पैसा कसा खर्च होतो आहे, या विचारानेच आम्ही स्तब्ध होतो, असेही त्यांनी नमूद केले.
एकीकडे निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि पैशांच्या वापरावर टीका करतानाच, आता सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती नाहीशी झाली असल्याचे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले. पूर्वी सामान्य नागरिक आणि प्रशासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सरकारी यंत्रणांची मोठी दहशत होती, परंतु आता ही भीती पूर्णपणे निघून गेली असून हाच सर्वात मोठा सकारात्मक बदल असल्याचे त्यांनी सांगितले. या परिवर्तनाचे श्रेय त्यांनी विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनांना दिले.
याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने जे धाडस दाखवले आहे, ते त्यांचे पालकही दाखवू शकले नव्हते; एकप्रकारे या मुलांनी आपल्या पालकांच्या भविष्याचे रक्षण केले आहे. निवडणूक व्यवस्थेत मूलभूत सुधारणा केल्याशिवाय देशाची परिस्थिती बदलणार नाही, याचा पुनरुच्चार करत विरोधी पक्ष या दिशेने सक्रियपणे कार्यरत असून आपल्याकडे निवडणूक गैरव्यवहारांचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोलंबिया विद्यापीठात भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांवर भारतीय जनता पक्षाने अत्यंत तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, "राहुल गांधी हे अपरिपक्व, भारतविरोधी आणि भारताचे 'मीर जाफर' आहेत. परदेशी धरतीवर जाऊन भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी केलेल्या निराधार, खोट्या आणि देशविरोधी विधानांमुळे प्रत्येक भारतीयाला लाज वाटत आहे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने लोकशाही, अर्थव्यवस्था, युवा सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर नवी शिखरे गाठली असल्याचे सांगत, संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी ते परदेशात आपल्या आकांकडून आदेश घेण्यासाठी जातात का, असा खोचक सवालही भाटिया यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांचे विरोधी पक्षनेतेपदी असणे हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका करत भाजपने त्यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे. भाजप नेते प्रदीप भंडारी यांनीही कोलंबिया विद्यापीठातील विधानांचा समाचार घेताना राहुल गांधी हे नेहमीच देशाच्या विरोधात बोलत असल्याचा आरोप केला. "राहुल गांधी हे भारतविरोधी अपप्रचार करणारे नेते बनले आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात भारताचा अपमान केला आहे. भारताचे वर्णन 'आर्थिक आपत्ती' असे करणारे हे विसरले आहेत की, संपूर्ण जग आज भारताला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून मान्यता देत आहे," असे भंडारी म्हणाले. राहुल गांधी यांच्या अशाच कृतींमुळे आज काँग्रेस पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.