लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.  Sansad TV
राष्ट्रीय

सभागृहात विरोधकांना बोलू द्याल! राहुल गांधी यांनी व्यक्त केली अपेक्षा

लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओम बिर्लांचे केले अभिनंदन

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

एनडीए (NDA) चे उमेदवार आणि कोटा येथील भाजप खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी (दि.२६) १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्याला पाठिंबा दिला. हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानाद्वारे मंजूर केला.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे लोकसभा अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की विरोधकांना बोलण्याची संधी द्याल. तुम्ही भारताच्या संविधानाचे रक्षण करण्याचे तुमचे कर्तव्य पार पाडाल. मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करू इच्छितो. तसेच सभागृहातील सर्व सदस्य ज्यांनी निवडणूक जिंकली आहे.''

'विरोधी पक्षाची सहकार्याची भूमिका'

राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल तुमचे अभिनंदन. संपूर्ण विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीच्या वतीने मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. हे सभागृह देशातील जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करते. सरकारकडे राजकीय शक्ती आहे. पण विरोधी पक्षदेखील देशातील जनतेचे प्रतिनिधित्व करतो. विरोधी पक्षाची तुमच्या कामकाजात सहकार्याची भूमिका आहे. सभागृहाचे कामकाज चांगले चालावे अशी आमची इच्छा आहे. विश्वासाच्या आधारावर सहकार्य घडणे खूप महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षाला या सभागृहात बोलण्याची मुभा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

४८ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक

भाजपप्रणीत एनडीएचे ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे के. सुरेश यांच्यात आज लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. ४८ वर्षांनंतर प्रथमच ही निवडणूक पार पडली. लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्यास सरकारने नकार दिला. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवर एकमत झाले नाही आणि इंडिया आघाडीने के. सुरेश यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT