लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा स्‍टॅलिन. Pudhari Photo
राष्ट्रीय

Delimitation Bill 2026 : ‘ब्रदर’ स्टॅलिन यांना राहुल गांधींनी घातली फेरविचाराची 'साद'; माजी मुख्यमंत्र्यांनीही दिले उत्तर

Rahul Gandhi MK Stalin Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात एकत्र येण्यासाठी भावनिक साद

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi MK Stalin Delimitation Bill : केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयकाला विरोध करण्यासाठी द्रमुकचे (DMK) अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्याच्या उद्देशाने राहुल गांधी 'इंडिया' आघाडीतील प्रमुख नेत्यांसह चेन्नईला रवाना झाले आहेत. या दौऱ्यापूर्वी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात एकत्र येण्यासाठी स्टॅलिन यांना भावनिक साद घातली आहे.

भारतातील लोकशाही संपेल : राहुल गांधी

"संसदेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत नेल्यास भारतातील लोकशाही संपेल. यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आपल्या सोयीनुसार संपूर्ण देशाचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्यासाठी अमर्याद मोकळीक मिळेल," असे राहुल गांधी यांनी आपल्या 'एक्‍स' पोस्टमध्ये म्हटले आहे.

तमिळविरोधी शक्तींविरुद्ध ब्रदर स्टॅलिन नेहमीच उभे

"तमिळविरोधी शक्तींविरुद्ध ब्रदर स्टॅलिन नेहमीच खडकासारखे भक्कम उभे राहिले आहेत. देशहित, तामिळनाडूचे हित आणि संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून या विधेयकाचा पराभव केला पाहिजे." या विधेयकाला विरोध करण्याची विनंती करण्यासाठी विरोधकांचे ज्येष्ठ नेते चेन्नईला जात असल्याचेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर आणि ठाम भूमिका

राहुल गांधींच्या या आवाहनाला उत्तर देताना स्टॅलिन यांनीही 'एक्‍स' पोस्‍टच्‍या माध्‍यमातून त्यांचे "मनापासून आभार" मानले अआणि त्यांचा उल्लेख "बंधू" असाच केला; मात्र आपल्या पक्षाच्या निर्णयावर ठाम असल्याचेही स्पष्ट केले. स्टॅलिन म्हणाले की, "संविधान आणि राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यात द्रमुकने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची दखल घेतल्याबद्दल बंधू राहुल गांधींचे मनःपूर्वक आभार. आम्ही नेहमीच तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित सर्वोच्च मानून प्रत्येक निर्णय घेतला आहे. या मार्गावरून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. इतिहास आमचे मूल्यांकन 'एट्टप्पन' (फितूर) म्हणून नाही, तर 'कट्टाबोम्मन' (स्वातंत्र्यवीर) म्हणून करेल, असा मला ठाम विश्वास आहे."

विरोधकांची मोर्चेबांधणी आणि मुंबई दौरा

आज दुपारी २ ते ५ या वेळेत राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी हे स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार असून, रात्री ८ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. विरोधकांच्या या शिष्टमंडळात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी यांच्यासह राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि समाजवादी पक्षाचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत.

सोमवारी विधेयक लोकसभेत मांडले जाणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडलेल्या सुधारित महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. पावसाळी अधिवेशनाचा विस्तार म्हणून उद्यापासून (सोमवार) ३ डिसेंबरपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून, त्यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या या हालचालींना वेग आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार, सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० टक्के वाढ आणि इतर बदलांसह लोकसभेच्या जागा ५४३ वरून कमाल ८५० पर्यंत वाढवल्या जाणार आहेत. यामध्ये २०५१ पर्यंत राज्यांच्या जागांचे प्रमाण १९७१ च्या जनगणनेनुसारच कायम ठेवले जाईल, तर मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाईल. यामुळे २०२९ च्या निवडणुकीपूर्वी लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

द्रमुक आणि राष्ट्रवादी पवार गटाचा पाठिंबा

विरोधकांच्या आघाडीतील घटक पक्ष असूनही द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मसुद्याला पाठिंबा जाहीर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी द्रमुक खासदार कनिमोळी यांनी खर्गे यांची भेट घेऊन पक्षाची भूमिका मांडली. विरोधकांमध्ये एकमत घडवून आणण्यात काँग्रेसने विलंब केला असून, आपल्या खासदारांची संख्या कमी होणे तामिळनाडूचे मतदार कधीही स्वीकारणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसेच, शिष्टमंडळाने स्टॅलिन यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला होता; मात्र काँग्रेसने भेटीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

द्रमुकच्‍या दोन्‍ही मागण्‍या मान्‍य : स्‍टॅलिन

शनिवारी या मसुद्याचे स्वागत करताना स्टॅलिन यांनी हा प्रस्ताव "व्यावहारिकदृष्ट्या शक्य आणि आमच्यासाठी फायदेशीर" असल्याचे म्हटले होते. तामिळनाडूचा ७.१८ टक्के वाटा सुरक्षित ठेवणे आणि १९७१ च्या जनगणनेचे प्रमाण कायम ठेवणे या द्रमुकच्या दोन्ही मागण्या यात लेखी स्वरूपात मान्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. "२०२४ पासून द्रमुकने केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचा हा विजय आहे. तामिळनाडूसह सर्वच दक्षिणेकडील राज्यांचा हा विजय आहे," असे स्टॅलिन म्हणाले होते. तर, "यामुळे तामिळनाडूचे कोणतेही नुकसान होणार नसून, राज्याचा ७.१८ टक्के वाटा वाढून ७.२१ टक्के होईल," असे द्रमुक नेते ए. राजा यांनी पत्रकारांना सांगितले.

एप्रिल महिन्‍यात स्‍टॅलिनने जाळली होती विधेयकाची प्रत

विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात यापूर्वीचे विधेयक लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी स्टॅलिन यांनी काळे झेंडे दाखवत या विधेयकाची प्रत जाळली होती आणि तमिळ जनतेला आपल्याच भूमीत 'निर्वासित' बनवणारा हा 'काळा कायदा' असल्याची टीका केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT