Rahul Gandhi Amit Shah defamation case verdict : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार/आमदार (MP/MLA) विशेष न्यायालयाने आज (दि. २६ ऑक्टोबर) काँग्रेस खासदार, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता, परंतु पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरूमध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यावरून सुलतानपूरमधील हनुमनगंजचे रहिवासी असणारे भाजप नेते विजय मिश्रा यांनी यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. ते सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.
अंतिम सुनावणीदरम्यान, राहुल गांधींच्या वकिलांनी मान्य केले की काँग्रेस नेत्यांनी तशी टिप्पणी केली होती, परंतु त्यांनी असा युक्तिवाद केला की, ही टिप्पणी सद्भावनेने केली गेली होती. त्यांचा कोणाचाही अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बचावा पक्षाने असाही दावा केला की, ही टिप्पणी विपर्यस्त करून आणि संदर्भाशिवाय मांडली गेली होती. तरतक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली की राहुल गांधींना दोषी ठरवावे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, टिप्पणी केल्याची कबुली देणे हेच त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे कारण आहे.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी विशेष दंडाधिकारी शुभम वर्मा यांनी पुराव्या अभावी राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली.
गेल्या काही वर्षांत हा खटला विविध टप्प्यांतून गेला. फेब्रुवारी २०२४ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले होते. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जुलै २०२४ मध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला, तर सुनावणीदरम्यान न्यायालयाने तक्रारदार आणि इतर साक्षीदारांचीही साक्ष घेतली. या खटल्यातील युक्तिवाद ६ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन १२ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले. न्यायालयाने निकालासाठी २६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.आज निकाल ऐकण्यासाठी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते.