Rahul Gandhi canva pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi : ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालयातील २०० अधिकारी आमच्या संपर्कात : राहुल गांधींचा गौप्यस्फोट

निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi on Delhi protest : "मला नरेंद्र मोदींना सांगायचे आहे की, तुमच्या सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात आहेत आणि आम्हाला माहिती देत आहेत. यामध्ये ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे," असा गौप्यस्फोट लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. १२ ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.

दिल्लीचे रूपांतर तुरुंगात का करण्यात आले?

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, "दिल्लीमध्ये मतांच्या चोरीविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रश्न असा आहे की, दिल्लीचे रूपांतर तुरुंगात का करण्यात आले आहे? लोकांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. त्यांना ट्रेन आणि बसेसमध्ये अडवले जात आहे. दिल्लीचे रूपांतर एका किल्ल्यात करण्यात आले आहे."

पंतप्रधान मोदींकडून ज्ञानेश कुमारांची पाठराखण

"२०,००० ते ३०,००० पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. सरकार मोठी चूक करत आहे. आम्हाला देशाला हे दाखवून द्यायचे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत आहेत. ज्ञानेश कुमार यांना जेवढे संरक्षण दिले जाईल, तितक्या लवकर आम्ही त्यांच्या 'नियंत्रकापर्यंत' पोहोचू. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की, पोलीस कर्मचारी अस्वस्थ आहेत; कारण त्यांना तरुणांना मारहाण करण्याचे आदेश दिले जात आहेत, तर दुसरीकडे आरएसएस (RSS) सदस्यांना मात्र मोकळीक दिली जात आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

हा लढा एका दिवसापुरता मर्यादित नाही

"भाजप सरकारकडून संविधानावर हल्ला केला जात आहे. हा लढा किंवा विरोध एका दिवसापुरता मर्यादित नाही; तो सुरूच राहील. खुद्द पोलीसही आता प्रश्न विचारत आहेत की, ते ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराचे रक्षण का करत आहेत आणि पोलिसांवरच हल्ले का करत आहेत? ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत? ज्ञानेश कुमार, तुमची झोप उडाली आहे; आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्हाला तुमच्या भूतकाळाबद्दल आणि भ्रष्टाचाराबद्दल माहिती आहे आणि आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत," असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

"भारतीय लोकशाहीची हत्या, निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबतची आमची गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्ष आणि मी सरन्यायाधीशांना लिहिले होते. सरन्यायाधीशांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि याचिका दाखल करण्यास सांगितले. आज, 'इंडिया' (INDIA) आघाडीचे नेते आणि मी मिळून सर्वोच्च न्यायालयात जाऊन ही याचिका दाखल करू," असे राहुल गांधी म्हणाले.

पोलीस म्हणतात, आम्ही करत आहोत ते योग्यच

"५० टक्के पोलीस कर्मचारी आम्हाला सांगत आहेत की, आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे आणि आम्ही ते सुरूच ठेवले पाहिजे. पोलीस, आयटीबीपी (ITBP), सीआरपीएफ (CRPF) आणि भारताची जनता एका बाजूला आहे; तर दुसरीकडे नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल, ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाचे ४-५ सदस्य आहेत, जे 'मतांची चोरी' आणि देशाचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेत मदत करत आहेत. आम्ही ही दरी अधिक रुंदावत आहोत," असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT