Radhakrishna Vikhe Patil Meet Amit Shah
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील देखील उपस्थित होते. मुंबईत झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ही भेट झाली. या भेटीनंतर लवकरच अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे समजते.
या भेटीबाबत माहिती देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. येत्या १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे.
तसेच लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पिंपरी निर्मळ (अस्तगाव माथा, शिव) येथे प प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या तिन्ही सोहळ्यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण अमित शाह यांना दिले.
अमित शाह यांनी या सर्व कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती मान्य केली, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपवली होती. विखे पाटलांनी या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला आंदोलनाचा संदर्भही असल्याचे समजते.