

Ganesh Visarjan 2025 :
देशभरात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहत सुरू असताना कर्नाटकातील रायचूर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघाजणांना ताब्यात घेतलं आहे.
रायचूर शहरातील गंगा निवास रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी दोघांनी घराच्या गच्चीवर येत तेथून मिरवणुकीवर दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळं लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी देखील झाले आहेत.
दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान ही दगडफेक जुन्या वादातून झाली असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढं आली आहे. आपण रहात असलेल्या परिसरातून गणेश विसर्जन मिरवणूक काढू नये म्हणून ही दगडफेक केल्याचं आरोपींनी कबूल केलंय असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं ही प्रशांत आणि प्रवीण अशी आहेत. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.