Uddhav & Raj Thackeray Reunite :
दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुप्रतिक्षीत मनोमिलन झालं होतं. ठाकरे ब्रँडच्या दोन मुलूख मैदान तोफा एकाच मंचावर आल्या होत्या. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आले होते. या दोन्ही ठाकरे बंधुंचे मनोमिलन झाल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. आता हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या (उबाठा) दसऱ्या मेळाव्यात राज ठाकरेंची एन्ट्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूचं मनोमिलन झालं आहे. मात्र निवडणुकीत अजून शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र येणार का याचं उत्तर गुलदस्त्यातच आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकमेकांना भेटणं पाहता एकत्र निवडणुका लढवण्याची फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे असं दिसतंय. ही घोषणा शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात होण्याची शक्यता आहे.
शिवसेना उबाठा गटाचे नेते सचिन अहीर यांनी नुकतेच एक वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'दसऱ्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येणार की नाही हे मला माहिती नाही. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे यांना आमंत्रण पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यांच्या पक्षाच्या रॅलीवेळी आमच्या पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित केलं जाऊ शकतं. सचिन अहीर पुढे म्हणाले की, 'यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा अभुतपूर्व असणार आहे.'
सचिन अहीर यांच्या वक्तव्याला नुकत्याच घडलेल्या एका कौटुंबिक भेटीची पार्श्वभूमी आहे. गणेश चतुर्थीवेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. २०२१ नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे देखील होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी लंच केला. उबाठा गटाच्या नेत्यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलं. मात्र या बैठकीवेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा झाली असल्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत.
उद्धव ठाकरेंप्रमाणे राज ठाकरेंनी देखील एका महिन्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. त्यापूर्वी जुलै महिन्यात त्रिभाषा धोरणाविरूद्धचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आयोजित केलेल्या विजयी रॅलीवेळी देखील हे दोन्ही भाऊ एकत्र एका स्टेजवर आले होते.
आता त्यांच्या वारंवार एकत्र भेटी अन् रॅली होत असल्यानं मनसे अन् शिवसेना उबाठा गट निवडणुकीत एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही.