प्रतिकात्‍मक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

Crime News : फोटोग्राफरच्‍या मृत्यूनंतरही प्रेयसीला येत राहिले २० दिवस मेसेज; एका बॅगने उघड केलं भयंकर सत्‍य!

मित्रांनीच काटा काढल्‍याचे स्‍पष्‍ट, आयफोनवरून सुरू होता बनाव; पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Crime News : पैशांचा वाद आणि वैयक्तिक वैमनस्यातून एका २७ वर्षीय फोटोग्राफरची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रयागराजमध्ये उघडकीस आली आहे. हत्येनंतर पकडले जाऊ नये म्हणून आरोपींनी मृतदेह निळ्या बॅगेत भरून मध्य प्रदेशात फेकून दिला आणि तब्बल २० दिवस मृत तरुणाच्याच आयफोनवरून त्याच्या प्रेयसीशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून तो जिवंत असल्याचा बनाव रचला.

मुलगा बेपत्ता झाल्‍याची आईची तक्रार

प्रयागराजच्या धूमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबर अपार्टमेंटमध्ये राहणारा आलोक गुप्ता (वय २७) हा व्यावसायिक फोटोग्राफर होता. २२ ऑगस्टपासून तो अचानक गायब झाल्याने त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.तपासादरम्यान पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन तरुण एक मोठी निळ्या रंगाची बॅग घेऊन जाताना दिसले.

मध्‍य प्रदेशमध्‍ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

त्याच काळात मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सोहागी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'सेल्फी पॉइंट'जवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. सोशल मीडियावर व्हायरल छायाचित्रांवरून प्रयागराज पोलिसांनी धागेदोरे जोडले असता तो मृतदेह आलोक गुप्ताचाच असल्याचे निष्पन्न झाले.

प्रेयसीला मेसेज अन् २० दिवसांचा थरार

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आलोकचा मित्र शुभम तिवारी याने आपले दोन साथीदार शुभम यादव आणि अंकुश यादव यांच्यासह मिळून ही हत्या केली. आलोकने दिलेले उधारीचे पैसे परत करावे लागू नयेत आणि त्यांच्यातील जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. हत्या केल्यानंतर मृतदेह निळ्या बॅगेत भरून कारने शेकडो किलोमीटर दूर रीवा येथे फेकून देण्यात आला. आलोक गायब झाल्याची शंका त्याच्या प्रेयसीला येऊ नये, यासाठी आरोपींनी त्याचा 'आयफोन' स्वतःकडे ठेवला. पुढील २० दिवस आरोपी आलोकच्या व्हॉट्सॲपवरून सतत मेसेज करत राहिला. डिजिटल ॲक्टिव्हिटी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना या बनावाचा सुगावा लागला.

तिघा आरोपींना बेड्या

पोलिसांनी सापळा रचून सुबेदारगंज उड्डाणपुलाखालून शुभम तिवारी, शुभम यादव आणि अंकुश यादव या तिघांना अटक केली. आरोपींकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस, ४ अँड्रॉइड मोबाईल, १ ब्लूटूथ डिव्हाइस आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्‍त करण्‍यात आले आहेत. संपूर्ण हत्येचा कट कसा रचला गेला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT