Prashant Kishor Net Worth : प्रशांत किशोर यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.  Pudhari
राष्ट्रीय

Prashant Kishor Net Worth : प्रशांत किशोरांपेक्षा त्‍यांची पत्‍नीच अधिक 'श्रीमंत'!, संपत्तीचा आकडा वाचून व्‍हाल थक्‍क!

संपत्तीची आकडेवारी 'पीकें'च्या प्रतिज्ञापत्रातून समोर, बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

Prashant Kishor Net Worth : पूर्वश्रमीचे राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील 'जन सुराज्य पक्षा'चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांच्याकडे एकूण ९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची जंगम आणि स्थावर संपत्ती आहे.

बांकीपूर विधानसभेतून लढवत आहेत निवडणूक

राजकीय रणनीतीकार ते राजकारणी बनलेले प्रशांत किशोर यांना 'पीके' म्हणूनही ओळखले जाते, हे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. किशोर यांनी सोमवारी पाटणा येथे 'पदयात्रा' काढल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३० जुलै रोजी मतदान होणार असून, ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

प्रशांत किशोर आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती

प्रशांत किशोर यांनी दाखल केलेल्‍या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्‍यांच्‍या नावे एकूण ९६ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. यामध्ये: जंगम संपत्ती २२.१९ कोटी तर स्थावर संपत्ती ७३.८७ कोटी रुपये आहे. तर त्‍यांच्‍या पत्नीकडे एकूण १०१.९३ कोटी रुपयांची संपत्ती असून, यातील जंगम संपत्ती: ८९.५१ कोटी रुपये तर स्थावर संपत्ती: १२.४२ कोटी रुपये आहे. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, प्रशांत किशोर यांच्याकडे ६५,५७० रुपये रोख (कॅश) आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे १,९५,२रुपये रोख आहेत.

पक्षाला आणि फाउंडेशनला कोट्यवधींची देणगी

या प्रतिज्ञापत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांचे एका खासगी कंपनीत १००% शेअर्स (नियंत्रण) आहेत. या कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात 'जन सुराज्य पक्षा'ला ८५ कोटी रुपये आणि 'जन सुराज्य फाउंडेशन'ला ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे.

८ प्रलंबित गुन्हेगारी खटले दाखल

निवडणूक अर्जातील माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्यावर ८ प्रलंबित गुन्हेगारी खटले दाखल आहेत. मात्र, कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात त्यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्यापासून राजकारणापर्यंतचा प्रवास

प्रशांत किशोर यांचे शालेय शिक्षण बक्सर येथे झाले. त्यांचे वडील श्रीकांत पांडे हे डॉक्टर तर आई सुशीला पांडे या गृहिणी आहेत. राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी २०११ पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या अर्थसहाय्यित सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांवर काम केले होते. त्यांनी २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये 'सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स' संस्‍थेची सह-स्थापना केली. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या यशस्वी प्रचारादरम्यान "चाय पे चर्चा", ३डी रॅली, 'रन फॉर युनिटी' आणि 'मंथन' यांसारख्या प्रसिद्ध मोहिमांचे तसेच सोशल मीडियाव प्रचाराचे श्रेय प्रशांत किशोर यांना दिले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT