Prashant Kishor Voter List Controversy : दोन राज्यांच्या मतदार यादीत नाव असल्याने जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर ( Prashant Kishor) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी करगहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस पाठवून तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
प्रशांत किशोर यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या मतदार यादीत असल्याची माहिती समोर आली आहे.करगहर विधानसभा मतदारसंघाचे सासाराम भू-राजस्व उप-जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये 'द इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोटचा हवाला देण्यात आला आहे. या अहवालानुसार, "जनप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम १७ नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये नोंदणी करण्याचा हक्क नाही." निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, कायद्याचे उल्लंघन झाल्यास जनप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत एक वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.
'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांचा पत्ता १२१ कालीघाट रोड, कोलकाता असा नोंद आहे, जिथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे (TMC) कार्यालय आहे. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत किशोर यांनी टीएमसीसाठी राजकीय सल्लागार म्हणून काम केले होते. पश्चिम बंगालमध्ये त्यांचे मतदान केंद्र बी. रानीशंकरी लेन येथील सेंट हेलेन स्कूल येथे नोंद आहे. तर बिहारमध्ये ते सासाराम संसदीय क्षेत्रांतर्गत असलेल्या करगहर विधानसभा मतदारसंघातील मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत. रोहतास जिल्ह्यातील मध्य विद्यालय, कोनार (त्यांचे वडिलोपार्जित गाव) हे त्यांचे मतदान केंद्र आहे.
वृत्तसंस्था 'एएनआय'ला प्रशांत किशोर यांनी सांगितले की, मी २०१९ पासून कारगहर विधानसभा मतदारसंघाचा मतदार आहे. दोन वर्षांपासून, जेव्हा मी कोलकातामध्ये होतो, तेव्हा मी तिथे मतदार ओळखपत्र बनवले होते. २०२१ पासून, माझे मतदार ओळखपत्र कारगहर विधानसभा मतदारसंघासाठी आहे. जनिवडणूक आयोग म्हणत असेल की माझे नाव इतर ठिकाणीही मतदार म्हणून नोंदणीकृत आहे, तर ते एसआयआर करून सर्वांना का त्रास देत आहेत? निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनेशी माझा काहीही संबंध नाही."
जनप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम १७ नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक मतदारसंघाच्या मतदार यादीत नोंदणी करण्याचा हक्क नाही. कलम १८ नुसार, कोणत्याही व्यक्तीला एकाच मतदारसंघाच्या मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करण्याचा हक्क नाही.नोंदणीनंतर, निवासस्थानात बदल झाल्यास किंवा त्रुटी सुधारण्यासाठी मतदाराला निवडणूक आयोगाचा फॉर्म ८ भरून आपल्या नोंदीत बदल करता येतो.