

पाटणा; वृत्तसंस्था : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची प्रशंसा केली आणि मागील सर्व निवडणुकीचे विक्रम मोडले जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, त्यांनी विरोधी महाआघाडी आणि त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली.
मोदींनी बिहारमधील एनडीएच्या कामगिरीवर प्रकाश टाकला, ज्यात औद्योगिक पुनरुज्जीवन, उत्तर आणि दक्षिण बिहारला जोडणे, तंत्रज्ञानाची सुधारित उपलब्धता यांचा समावेश आहे. त्यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि विश्वासार्ह प्रशासनाचे आश्वासन दिले. मोदी यांनी शुक्रवारी समस्तीपूर येथे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए बिहार विधानसभा निवडणुकीत मागील सर्व निवडणुकीचे विक्रम मोडेल.’ मोदी यांनी विरोधी पक्ष असलेल्या महाआघाडीवर टीका केली आणि त्यांच्यातील एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंतर्गत मतभेद दाखवतात की हा एक लठबंधन आहे, असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला.
ते म्हणाले की, एनडीएच्या राजवटीत बिहारला विश्वासार्ह प्रशासन मिळेल आणि जंगलराज नियंत्रणात राहील. ‘नयी रफ्तार से चलेगा बिहार, फिर जब आएगी एनडीए सरकार (एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर बिहारचा विकास वेगाने होईल). राजद आणि काँग्रेसने घोटाळे केले, त्यांचे नेते जामिनावर बाहेर आहेत आणि आता ते भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांची जननायक ही उपाधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असेही ते म्हणाले.