प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari News
राष्ट्रीय

Sonia Gandhi Autobiography : महत्त्‍वाकांक्षी असणे गुन्‍हा आहे का? प्रणव मुखर्जींच्या मुलीचा सोनिया गांधींना सवाल

घराणेशाहीच्या हक्कापोटी त्‍यांना पंतप्रधानपद किंवा इतर कोणतीही पदे ताटात वाढून दिली नव्हती

पुढारी वृत्तसेवा

Pranab Mukherjee prime minister ambition Sonia Gandhi memoir

२०१० मध्‍ये प्रणव मुखर्जींनी पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मला 'धक्का' बसला होता, अशी आठवण काँग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍या सोनिया गांधी यांनी 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या आत्‍मचरित्रातून सांगितली आहे. आता त्‍याला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्‍या वडिलांनी राजकीय पदे कठोर परिश्रमातून मिळवली

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी 'एक्स'वर शेअर केलेल्‍या पोस्टमध्‍ये वडिलांचा अनुभव आणि त्यांच्या कारकिर्दीचे समर्थन करता म्‍हटलं की, माझ्‍या वडिलांना राजकारणात मिळालेली पदे ही 'घराणेशाहीच्या हक्कांतून' नव्हे, तर कठोर परिश्रमातून मिळवली होती.

सोनिया गांधींचा मोठा दावा

सोनिया गांधींनी त्यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात २०१० मधील एका संभाषणाचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, प्रणव मुखर्जींनी 'नेतृत्वात बदल' (change at the top) करण्याची वेळ आली असल्याचे सुचवले होते. सोनिया गांधी यांनी याचा अर्थ प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनण्याचे आहे, असा लावला. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. प्रणव मुखर्जी हे यूपीए (UPA) सरकारमधील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. राष्ट्रपती होण्यापूर्वी २००४ ते २०१२ या काळात त्यांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि अर्थ मंत्रालयांसारखी महत्त्वाची पदे भूषवली होती.

'महत्त्वाकांक्षी असणे हा गुन्हा आहे का?'

शर्मिष्ठा यांनी लिहिले, "यात 'धक्का' बसण्यासारखे काय आहे? महत्त्वाकांक्षी असणे हा गुन्हा आहे का? विशेषतः जेव्हा त्या 'महत्त्वाकांक्षे'च्या मागे राजकारण आणि प्रशासनातील अनेक दशकांचा अनुभव, कठोर परिश्रम आणि प्रगल्भ बुद्धिमत्ता असते?" त्यांनी आठवण सांगितली की, एकदा त्यांनी आपल्या वडिलांना विचारले होते की त्यांना पंतप्रधान व्हायचे आहे का? त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले होते की, "राजकारण्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असते, त्याच्या मनात अशी महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे."

त्‍यांना कोणतीही पदे ताटात वाढून दिली नव्‍हती

शर्मिष्ठा यांनी सांगितले की, त्यांचे वडील अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आले होते आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या व मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवले होते. त्यांना कोणीही घराणेशाहीच्या हक्कापोटी पंतप्रधानपद किंवा इतर कोणतीही पदे ताटात वाढून दिली नव्हती." यानंतर त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील कोणीतरी या पदाची इच्छा व्यक्त केली, म्हणून सोनिया गांधींना आश्चर्य वाटले असावे का? “एखाद्या पात्र व्यक्तीने पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली, तर त्यात चुकीचे काय आहे? कदाचित सोनियाजींना या गोष्टीचाच धक्का बसला असावा की, गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील कोणीतरी अशी महत्त्वाकांक्षा बाळगण्याचे धाडस कसे करू शकते आणि इतकेच नव्हे, तर तसा ‘संकेत’ देण्याचे धाडस कसे करू शकते?” असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

सोनिया यांनी आपल्या आत्मचरित्रात काय नमूद केले आहे?

सोनिया यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, काँग्रेस नेतृत्वाच्या बैठकांनंतर प्रणव मुखर्जी अनेकदा गप्पा मारण्यासाठी थांबत असत. त्यांनी नमूद केले की, पी. चिदंबरम यांच्यासोबत त्यांचे गंभीर मतभेद निर्माण झाले होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, सोनिया लिहितात, “२०१० मधील एका प्रसंगी, आपली निराशा व्यक्त केल्यानंतर, त्यांनी मला एक असा प्रस्ताव देऊन धक्का दिला की, कदाचित आता नेतृत्वात बदल करण्याची वेळ आली आहे. मला समजले की, पंतप्रधान बनण्याची त्यांची दीर्घकाळची इच्छा व्यक्त करण्याचा हा एक संकेत होता. यावेळी मी अत्यंत सौम्यपणे विषयांतर केले. कदाचित त्यांना निराशा झाली असेल, पण त्यांनी कधीही असे जाणवू दिले नाही की, त्यांना माझ्याबद्दल काही राग किंवा खंत आहे.”

प्रणव मुखर्जी एक विद्वान आणि ज्ञानी राजकारणी

सोनिया यांनी हेही आठवणीत सांगितले की, २०१२ मध्ये काँग्रेसने प्रणव मुखर्जी यांना यूपीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले होते. ते राष्ट्रपती झाल्यानंतर, सोनिया अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात असत. त्यांनी प्रणव मुखर्जींचे वर्णन एक “विद्वान आणि ज्ञानी राजकारणी” असे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT