Prayagraj Magha Mela Porsche car
प्रयागराज : येथे सध्या माघ मेळ्याचा उत्साह ओसंडून वाहत आहे. हजारो साधू-संत आणि भाविक दररोज श्रद्धेची डुबकी लावत आहेत. या मेळ्यात अनेक प्रकारचे संत पाहायला मिळतात. काही संतांनी संसाराचा पूर्ण त्याग केला आहे, तर काही संतांचा थाट एखाद्या बड्या श्रीमंतालाही लाजवेल असा आहे. सध्या या मेळ्यात संतोष दास उर्फ सतुआ बाबा यांच्या 'राजेशाही' थाटाची जोरदार चर्चा रंगली आहे. आलिशान कारची पूजा करतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संपूर्ण मेळ्यात ही कार आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
सतुआ बाबा यांना नुकतेच या पवित्र मेळ्यात 'पोर्शे' (Porsche) कार चालवताना दिसले. त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यापूर्वी ते ३ कोटी रुपये किमतीची 'लँड रोव्हर डिफेंडर' चालवताना दिसले होते. एका अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या या कोट्यवधींच्या गाड्यांमुळे काही स्तरांतून त्यांच्यावर टीकाही होत आहे.
कोट्यवधींच्या गाड्यांचा ताफा मिळालेल्या माहितीनुसार, सतुआ बाबांकडे आलिशान गाड्यांचा मोठा ताफा आहे. त्यांच्या ताफ्यात 'लँड रोव्हर डिफेंडर'सह अनेक महागड्या गाड्या आधीच असताना आता त्यात 'पोर्श' (Porsche) कारची भर पडली आहे. या कारची किंमत ३ ते ४.४० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
सतुआ बाबांनी माघ मेळ्यातील आपल्या शिबिरात या कारची विधिवत पूजा केली. यावेळी इतर साधू-संतही उपस्थित होते. या आलिशान कारची पूजा करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संपूर्ण मेळ्यात ही कार आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.
सतुआ बाबा यांचे मूळ नाव जगद्गुरु महामंडलेश्वर संतोष दास आहे. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. २०१२ मध्ये सतुआ बाबा पीठाच्या सहाव्या पीठाधीश्वरांच्या निधनानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. २०२५ च्या महाकुंभमध्ये त्यांना 'जगद्गुरु' ही पदवी प्रदान करण्यात आली. माघ मेळ्यात त्यांना सर्वात मोठा भूखंड आवंटित करण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्यात ४.४ कोटींची 'पोर्शे टर्बो ९११' आणि ३ कोटींची 'लँड रोव्हर' आहे. विशेष म्हणजे, ते ट्रॅक्टर आणि उंटाची सवारी करतानाही दिसतात.
विरोधकांना सडेतोड उत्तर "संतांना अशा आलिशान सुखसोयींची काय गरज?" असा प्रश्न विचारला असता सतुआ बाबांनी 'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "जे आमच्यावर टीका करतात त्यांनी आधी स्वतःच्या कुटुंबात डोकावून पहावे. त्यांची कुटुंबे पिढ्यानपिढ्या विलासात राहिली आहेत. त्यांनी देशाचे शोषण केले आणि त्यांची मुले थेट मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात. आज जेव्हा सामान्य माणूस आणि अध्यात्म जगताची प्रगती होत आहे, तेव्हा त्यांच्या पोटात का दुखत आहे? जर त्यांना देशाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी गाड्या सोडून जनतेत राहावे. आध्यात्मिक मेळ्यात अशा वाहनांचे येणे हा एक मोठा सकारात्मक संदेश आहे."