

Iran protests indian government advisory
तेहरान : इराणमध्ये सरकारविरोधातील आंदोलनानंतर सुरु झालेल्या हिंसाचाराने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. इराणमधील वेगाने बिघडत चाललेली सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय अस्थिरता पाहता तेहरानमधील भारतीय दूतावासने तेथील भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटकांना उपलब्ध व्यावसायिक विमानांच्या (Commercial Flights) माध्यमातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमध्ये सध्या सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दूतावासाने स्पष्ट केले आहे की, हा सल्ला ५ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचाच पुढील भाग आहे. "इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी कोणत्याही उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडावे," असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गर्दीपासून दूर राहा: कोणत्याही प्रकारचे निषेध, निदर्शने किंवा गर्दीच्या ठिकाणांपासून लांब राहावे.
दस्तावेज सोबत ठेवा: पासपोर्ट, ओळखपत्र आणि इमिग्रेशनशी संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे नेहमी स्वतःजवळ आणि सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवावीत.
स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवा: ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांच्या संपर्कात राहावे.
आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी भारतीय दूतावासाने विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. भारतीय नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:+९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९३२१७९३५९
इराणमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आलेली कारवाई यामुळे परदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच अमेरिकेकडून इराणला दिल्या जाणाऱ्या लष्करी कारवाईच्या धमक्यांमुळे हा तणाव अधिकच वाढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.