नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात नवीन स्थिती अहवाल दाखल केला. या अहवालामध्ये पोलिसांनी दावा केला की, दोन अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी यूपीएससीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा- २०२२ आणि २०२३ दरम्यान दोन अपंगत्व प्रमाणपत्र (एकाधिक अपंगत्व) सादर केली होती. ही दोन्ही प्रमाणपत्र अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केली आहेत, असे पूजाने सांगितले होते. अहमदनगर वैद्यकीय प्राधिकरणाकडून तपासण्यात आलेले हे दोन्ही प्रमाणपत्र पोलिसांना मिळाले.
प्राधिकरणाने म्हटले आहे की, 'आमच्या सिव्हिल सर्जनच्या कार्यालयातील नोंदीनुसार, या प्राधिकरणाने अपंगत्व प्रमाणपत्र (एकाधिक अपंगत्व) क्रमांक MH2610119900342407 जारी केलेले नाही. त्यामुळे हे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असण्याची शक्यता आहे, असे दिल्ली पोलिसांनी अहवालात सांगितले आहे.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर दाखल केले होते. यूपीएससी परीक्षेत आरक्षणासाठी उमेदवाराचे ४०% अपंगत्व असणे आवश्यक आहे. मी ४७% अपंग आहे. त्यामुळे केवळ अपंग श्रेणीतील माझे प्रयत्न यूपीएससी परीक्षेत गणले जावेत, असे खेडकरने म्हटले होते.