

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे केंद्रीय लोकसेवा आयोगाला आढळून आले. यामुळे त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून प्रतिबंधित करण्यात आले आहे.
''यूपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या असून सीएसई-२०२२ नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर दोषी आढळल्या आहेत. यामुळे नागरी सेवा परीक्षा (CSE-2022) साठी त्यांची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आणि त्यांना UPSC च्या भविष्यातील सर्व परीक्षा/निवड यापासून कायमचे प्रतिबंधित करण्यात आले आहे,” असे सरकारने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
खेडकर यांना एका प्रकरणात केवळ त्यांचे नावच नाही तर तिच्या पालकांचे नावदेखील बदलले. या वस्तुस्थितीमुळे त्यांच्या प्रयत्नांची संख्या शोधता येऊ शकली नाही, असे सांगत यूपीएससीने पुष्टी केली आहे की भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SOP) अधिक मजबूत केली जात आहे.
"पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, यूपीएससीने नागरी सेवा परीक्षांच्या २००९ ते २०२३ पर्यंतच्या म्हणजेच १५ वर्षांच्या अटेम्ट्सच्या संख्येच्या संदर्भात १५ हजारांहून अधिक अंतिम शिफारस केलेल्या उमेदवारांच्या उपलब्ध आकडेवारीची सखोल तपासणी केली. या तपशीलवार नोंदी तपासल्यानंतर, पूजा मनोरमा दिलीप खेडकर वगळता इतर कोणत्याही उमेदवाराने नागरी सेवा परीक्षांच्या नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त अटेम्ट्सचा लाभ घेतल्याचे आढळून आलेले नाही," असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज बुधवारी (दि.३१) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंदर कुमार जंगला यांच्यासमाेर दाेन्ही बाजूंनी जाेरदार युक्तिवाद केला. पूजा खेडकरांनी माध्यमांकडे स्वत:ची बाजूच मांडलेले नाही. कारण त्यांचा व्यवस्था आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. लैंगिक छळाची तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आराेप केले जात अहेत, असा दावा यावेळी खेडकरांच्या वकिलांनी केला. तर कोणातरी फसवणूक केल्याशिवाय फसवणूक होऊ शकत नाही. या प्रकरणात 'यूपीएससी'ची फसवणूक झाली आहे, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवला. गुरुवार, १ ऑगस्ट राेजी दुपारी ४ वाजता निर्णय दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.