Police Officer Arrested Murder Case:
रमना गावाजवळ ग्रामस्थांना शेतात एका महिलेचा नग्न मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांना याची वर्दी दिली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना वेगळाच संशय आल्यानं त्यांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. मृतदेहावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. मात्र मृतदेह पाहून त्याची ओळख काही पटत नव्हती.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली. त्यानंतर हा मृतदेह ३० वर्षाच्या किरण देवी यांचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर या घटनेची त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. किरण देवी यांचे भाऊ विजय कुमार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्वरित दोन नावं घेतली. एक नाव किरणच्या पतींचं होतं तर दुसरं नाव हे एका पोलीस अधिकाऱ्याचं होतं.
किरण यांचा विवाह हा CRPF जवान विनोद सिंह यांच्यासोबत झाला होता. काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. प्रकरण खूप वाढल्यामुळं किरण यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात हुंड्यावरून छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केली होती.
हा तपास कबरई पोलीस स्टेशनचे SI अंकित यादव करत होते. तपासावेळी अंकित आणि किरण देवी यांची वारंवार भेट होत होती. संपर्क वाढत गेला. आधी मैत्री अन् नंतर प्रेमसंबंध देखील निर्माण झाले. मात्र याची कुटुंबियांना थोडीशी देखील कल्पना नव्हती. मात्र हे दोघे दीर्घ काळापासून एकमेकांना भेटत होतं.
दरम्यान किरण देवी हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अंकित यानं आपल्या ओळखीतल्या एका व्यक्तीकडे त्यांची गाडी मागितली होती. या गाडीतून अंकित किरण यांना हमीरपूरकडे निघाला होता. या दोघांच्या हालचाली टोल प्लाझा आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी मौदहा भागाजवळ हे दोघे काही काळ थांबले होते. याचवेळी खासगी मुद्द्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला प्रकरण मारामारीपर्यंत पोहचलं. तपासात असं पुढं आलं आहे की अंकितला राग आला अन् त्यानं रागाच्या भरात गाडीतील लोखंडी रॉडनं किरणवर अनेकवेळा हल्ला केला. गंभीररित्या जखमी झालेली किरणचा घटनास्थळीत मृत्यू झाला.
दरम्यान, हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी अंकितनं किरणचा नग्न अवस्थेतील मृतदेह शेतात फेकला. त्यानं किरणचे कपडे आणि मोबाईल आपल्या जवळ ठेवला. त्याचा यामागं पुरावा, ओळख लपवण्याचा उद्येश होता.
मात्र किरणच्या फोनची लास्ट लोकेशन, अंकितचा मोबाईल डाटा, दोघांचे कॉल रेकॉर्ड्स आणि गाडीचा प्रवास या सर्वांवरून पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा ठरवली. त्यानंतर हमीरपूर पोलिसांनी महोबा पोलीसच्या मदतीनं आरोपी SI अंकित यादवला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यावर त्यानं गुन्हा कबूल केला.
त्यानंतर पोलिसांनी अंकितच्या ताब्यात असलेल्या गाडीतून लोखंडी रॉड, किरण देवींचा मोबाईल जप्त केला. हमीरपूरचे एसपी डॉक्टर दिक्षा शर्मा यांनी मृतदेह मिळाल्यानंतर याचा तपास करण्यासाठी अनेक टीम कामाला लावल्या होत्या. या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून आरोपीपर्यंत काही तासातच पोलीस पोहचले. एका पोलीस अधिकाऱ्याविरूद्धचे हे आरोप गंभीर होते.
मृत किरण देवीचा भाऊ विजय कुमार यांनी सांगितलं की बहीण अनेक दिवसांपासून तनावातून जात होती. तिला भविष्याची चिंता होती. तिनं काही दिवसांपूर्वी SI अंकितचा चर्चेदरम्यान उल्लेख केला होता. मात्र त्यांचं नातं इतक्या पुढं गेल्याचा त्याला अंदाज आला नाही. कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.