

जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहीण सुखाचा संसार करते आणि आपले लग्नही होत नसल्याच्या अंधश्रद्धेतून आणि मत्सरापोटी सख्ख्या चार मावश्यांनी मिळून अवघ्या 17 दिवसांच्या भाच्याची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपी महिलांना ताब्यात घेतले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील नेहरू कॉलनी परिसरात राहणारे पुनमराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी सुमन हिने 24 ऑक्टोबर रोजी एका मुलाला जन्म दिला होता. शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास पत्नी सुमनचा त्यांना फोन आला आणि तिने जे सांगितले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुमनच्या चार बहिणी- रामेश्वरी, ममता, गीता आणि मंजू यांनी मिळून त्यांच्या मुलाला मारल्याचे तिने सांगितले.
वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, एका मावशीने बाळाच्या अंगावर उडी मारून त्याची हाडे तोडली, त्यानंतर सर्वांनी मिळून गळा दाबून त्याचा जीव घेतला. या घटनेनंतर बाळाला महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या अमानुष हत्येमागे मत्सर आणि अंधश्रद्धा असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. बाळाचे वडील पुनमराम आणि आजोबा राजुराम यांनी आरोप केला आहे की, सुमनच्या अविवाहित बहिणी तिच्या सुखी संसाराचा मत्सर करत होत्या.
सुमनच्या कुटुंबात एकूण सात भावंडे असून, त्यातील पाच बहिणी अविवाहित आहेत आणि त्या त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात. सुमन सासरी सुखाने नांदत असल्याचा त्यांना राग होता. याच मत्सरातून आणि या मुलामुळे आपले लग्न होत नाही अशा अंधश्रद्धेतून त्यांनी माझ्या नातवाची हत्या केली, असा गंभीर आरोप आजोबांनी केला आहे.
रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. बाळाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपी मावश्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, या अमानुष कृत्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.