PM Narendra Modi Speech Arunachal Pradesh :
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इशान्येकडील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अरूणाचल प्रदेशमधील इटानगर इथून लोकांना संबोधित केलं. या भाषणावेळी त्यांनी आपलं नॉर्थ ईस्ट राज्यांवर किती प्रेम आहे हे देखील सांगितलं. याचबरोबर त्यांनी या आठ राज्यांची पूजा करतो असं देखील वक्तव्य केलं. नरेंद्र मोदी यांनी यानंतर काँग्रेसच्या काळात त्यांचे मंत्री या इशान्येकडील राज्यांकडे कसं दुर्लक्ष करत होते हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटानगरमधील आपल्या भाषणात म्हणाले, 'इशान्येकडील राज्यात विकास पोहचण्यास दशकं लागली. अरूणाचल प्रदेशाला निसर्गाची देणगी लाभली आहे. यापूर्वीच्या केंद्र सरकारांनी अरूणाचल प्रदेशच्या लोकांकडे दुर्लक्ष केलं होते. काँग्रे सारख्या पक्षाचा विचार होता की अरूणाचल प्रदेश सारख्या राज्यात कमी लोकं राहतात. तिथं फक्त २ लोकसभा सीट आहेत. त्यावर का लक्ष द्यायचं अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं पूर्ण नॉर्थ ईस्ट राज्यांचा विकास खुंटला.'
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'आमची मतदारांच्या संख्येकडे पाहत नाही. आम्ही राष्ट्र प्रथम या विचारधारेचे आहोत. आमचा एकच मंत्र नागरिक देवो भव!!' मोदींनी नॉर्थ ईस्टच्या ८ राज्यांना अष्टलक्ष्मी संबोधलं अन् त्याची आम्ही पूजा करतो असं देखील म्हटलं.
मोदी काँग्रेसवर टीका करताना पुढं म्हणाले, 'काँग्रेसच्या काळात मंत्री नॉर्थ ईस्टमध्ये २ ते ३ महिन्यातून एकदा यायचे. आमच्या सरकारच्या काळात आमचे केंद्रीय मंत्री ८०० पेक्षा जास्त वेळा नॉर्थ ईस्टला भेट देऊन गेले आहेत. ते दुर्गम भागातील जिल्हा आणि गावात गेले आहेत. मी पंतप्रधान म्हणून नॉर्थ ईस्टला जवळपास ७० पेक्षा जास्तवेळा भेट देऊन गेलो आहे.'
ते पुढे म्हणाले, 'नॉर्थ ईस्ट मला मनापासून आवडतं, त्यामुळंच आम्हाला मनातील अंतर संपवायचं आहे. दिल्लीला तुमच्या जवळ आणायचं आहे.'