Narendra Modi: पंतप्रधान मोदी शेअर करणार तुम्ही गायलेलं किंवा तुमचं आवडतं भजन! नवरात्रीनिमित्त खास आवाहन
Narendra Modi
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या नवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोदींनी जीएसटी बचत उत्सवासह स्वदेशीचा नारा देत विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी एक अनोखं आवाहन करत सांगितलं आहे की, ते येत्या काही दिवसांत लोकांची आवडती भजने किंवा लोकांनी गायलेली भजने आपल्या सोशल मीडियावर शेअर करणार आहेत.
मोदी यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नवरात्रीच्या या पवित्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भक्ती, धैर्य, संयम आणि दृढनिश्चयाने भरलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन सामर्थ्य आणि नवीन विश्वास घेऊन येवो. जय माता दी!”
स्वदेशी विकत घ्या
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशीच देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत असून, संपूर्ण देशवासीयांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच पंतप्रधनान मोदी यांनी स्वदेशीचा नारा बुलंद करण्याची गरज अधोरेखित केली. मोदी यांनी यावर्षीची नवरात्री खूप खास असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, “यावेळी नवरात्रीचा हा शुभ प्रसंग खूप खास आहे. जीएसटी बचत उत्सवासोबतच स्वदेशीचा मंत्र या काळात नवीन ऊर्जा प्राप्त करणार आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आपण सामूहिक प्रयत्नांसाठी एकत्र येऊया.”
नरेंद्र मोदी करणार तुमचं भजन शेअर
त्याशिवाय मोदींनी नवरात्री आणि भक्तीभाव याबद्दल आणखी एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, "नवरात्री म्हणजे शुद्ध भक्ती. अनेक लोकांनी संगीताच्या माध्यमातून ही भक्ती व्यक्त केली आहे. अशाच एका भावपूर्ण गायन, पंडित जसराज जी यांचे, मी शेअर करत आहे." पुढे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, “जर तुम्ही एखादे भजन गायले असेल किंवा तुमचे आवडते भजन असेल, तर ते माझ्यासोबत शेअर करा. येत्या काही दिवसांत मी त्यापैकी काही पोस्ट करेन!”

