PM Modi wdfc project launch : नरेंद्र मोदी यांनी आज (8 सप्टेंबर) गुजरातमधील वडोदरा येथे 35 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यावेळी त्यांनी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) मधील तीन महत्त्वाचे टप्पे राष्ट्राला समर्पित केले. या तीन टप्प्यांच्या कार्यान्वित होण्यामुळे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पश्चिम विभागाचं संपूर्ण नेटवर्क आता पूर्ण लांबीवर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीची क्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत आहे.
पश्चिम विभागीय मालवाहू कॉरिडॉरचा (WDFC) च्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण झाल्यामुळे हा संपूर्ण भव्य प्रकल्प आता पूर्णत्वाला जाणार आहे. वडोदरा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रातील JNPA (जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयुक्तपणे हिरवा झेंडा दाखवून या सेवांचा शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते तीन नवीन रेल्वे प्रकल्प आणि तीन महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज येथून 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'चे (मालवाहतूक मार्गिका) अंतिम दुवे जोडले गेले आहेत. यासह, २,८०० किलोमीटरहून अधिक लांबीचा 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' प्रकल्प पूर्ण झाला आहे. २१ व्या शतकातील भारतासाठी ही खरोखरच एक ऐतिहासिक कामगिरी आहे. गेल्या १२ वर्षांत देशाच्या कार्यसंस्कृतीत कसा बदल झाला आहे, याचा हा 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' एक पुरावा असल्याचेही त्यांनी नमूद केले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'ची संकल्पना सर्वप्रथम २००४ मध्ये मांडली गेली होती. याचे काम पूर्ण करण्यासाठी २००६ मध्ये एक विशेष कंपनी स्थापन करण्यात आली होती, तरीही २०१४ पर्यंत त्यासंबंधीच्या फाइल्स केवळ इकडून-तिकडे फिरत राहिल्या. त्या फाइल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत होत्या आणि गंमत म्हणजे, त्या फाइल्सना स्वतःचा असा कोणताही 'डेडिकेटेड कॉरिडॉर' (अडथळामुक्त मार्ग) कधीच मिळाला नाही. २०१४ मध्ये वडोदरा आणि गुजरातमधील जनतेने मला गुजरातहून दिल्लीला पाठवले. तेव्हाची वस्तुस्थिती अशी होती की, ७-८ वर्षांत या मालवाहतूक मार्गिकेचे एक किलोमीटरचे कामही झालेले नव्हते. जर देश त्यांच्या कार्यपद्धतीनुसार चालला असता, तर पुढच्या तीन-चार पिढ्यांनाही हे काम पूर्ण झालेले दिसले नसते. भारताची लॉजिस्टिक्स (मालवाहतूक व वितरण) व्यवस्था बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची अशी अवस्था होती. २०१४ नंतर, याच भूमीवर शिकलेल्या गोष्टी आणि दिल्लीला जाताना सोबत नेलेले अनुभव यांच्या आधारे आम्ही या प्रकल्पाला गती देण्याचे काम तातडीने सुरू केले," असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) अंतर्गत २०,७०० कोटींहून अधिक खर्च करून उभारलेल्या ३२६ किलोमीटर लांबीच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदरा दौऱ्यात करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे देशातील रसद पुरवठा व्यवस्थापनाचा (Logistics) खर्च लक्षणीयरीत्या घटणार असून जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी (JNPT) थेट दळणवळण प्रस्थापित होणार आहे.
WDFC मालवाहू कॉरिडॉरमुळे उद्योग आणि व्यापाराला मिळणार चालना
पंतप्रधानांनी साणंद (उत्तर) ते मकरपुरा, न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जेएनपीटी या तीन टप्प्यांचे लोकार्पणामुळे मालवाहू मार्गामुळे आयात-निर्यात वाहतूक अत्यंत वेगाने होईल. वस्तु पुरवठा व्यवस्थापन अधिक मजबूत होऊन वस्तूंची वाहतूक विनाअडथळा शक्य होणार असल्याने मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील. याशिवाय मुंबईतील स्थानिक रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी होण्यासही मोठी मदत होणार आहे.
पंतप्रधानांनी वडोदरा आणि टांडा रोड दरम्यानच्या नवीन रेल्वे गाडीचा प्रारंभ केला. तसेच छोटा उदेपूर-धार प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या 'जोबट-टांडा रोड' या नवीन रेल्वे मार्गाचे राष्ट्रार्पण करतील. यामुळे अलिराजपूर, छोटा उदेपूर यांसारखे दुर्गम व आदिवासी भाग पहिल्यांदाच राष्ट्रीय रेल्वे सेवेशी थेट जोडले जातील.
प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते ९,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन नव्या रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये वडोदरा-रतलाम तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनचा समावेश आहे, ज्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेश दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
रेल्वेसोबतच वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी सुमारे १,७८० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे (उदा. कामरेज-चलथान सहापदरीकरण, तापी व नर्मदा नद्यांवरील नवीन पूल) भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. तसेच, गुजरात सरकारच्या २,६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ झाला. यामध्ये कडणा धरणावरील ११० मेगावॅटचा तरंगता सौर प्रकल्प, वडोदरा रिंग रोडचा दुसरा टप्पा, 'पीएम आवास योजने'अंतर्गत घरे आणि पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.
गुजरात येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी सुमारे ५:४५ वाजता मुंबईत दाखल होतील. मुंबईत आयोजित 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' (GFF) अर्थात जागतिक वित्तीय तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडेल.यावर्षीच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची संकल्पना 'पोटेंशियल टू इम्पॅक्टः एजंटिक एआय, टोकेनायझेशन, क्वांटम टस्टेड्, कनेक्टेड, ग्लोबल सिस्टिम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स' ही आहे. मुंबईतील या सोहळ्यात पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करून देशाच्या आर्थिक तंत्रज्ञानातील प्रगतीची दिशा स्पष्ट करणार आहेत.