PM Narendra Modi | ‘मुलांचे बालपण जपा, संवेदनशील पिढी घडवा‘ : पंतप्रधान नरेंद्र मोदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संवादाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका कुंदा बच्छाव भारावल्या
PM Narendra Modi | ‘मुलांचे बालपण जपा, संवेदनशील पिढी घडवा‘ : पंतप्रधान नरेंद्र मोदी!
PM Narendra Modi | ‘मुलांचे बालपण जपा, संवेदनशील पिढी घडवा‘ : पंतप्रधान नरेंद्र मोदी!
Published on
Updated on

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत दिसणारी उत्सुकता, त्यांच्या मनात निर्माण होणारे असंख्य प्रश्न आणि बदलत्या काळाबरोबर शिक्षकांसमोर उभी राहणारी नवी आव्हाने... याच अनुभवांना थेट देशाच्या पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मिळाली. यामध्ये महाराष्ट्रातील ९ शिक्षकांचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तब्बल २ तास संवाद आणि चर्चा ही अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे, अशा भावना नाशिकच्या महापालिका शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी "पुढारी"शी बोलताना व्यक्त केल्या. 

‘हा संवाद म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण’

पंतप्रधानांसोबत झालेल्या या संवादाबद्दल बोलताना कुंदा बच्छाव म्हणाल्या की, पंतप्रधानांनी शिक्षकांची भूमिका, जबाबदारी आणि भविष्यातील आव्हाने याबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला. केवळ पुरस्कारप्राप्त शिक्षक म्हणून नव्हे, तर देशाचा सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावर आहे, ही जाणीव या संवादातून अधिक दृढ झाली. आयुष्यात पहिल्यांदाच पंतप्रधानांशी संवाद साधणे अविस्मरणीय क्षण असल्याचे कुंदा बच्छाव म्हणाल्या. 

‘अभ्यासक्रमात बालपण हरवू नये’

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेबरोबरच त्यांच्या बालपणाचे जतन करण्यावर आणि त्यांच्यामध्ये सर्जनशीलता वाढवण्यावर दिलेला भर विशेष भावल्याचे बच्छाव म्हणाल्या. अभ्यासक्रमात मुलांची संवेदनशीलता आणि त्यांचे निरागस बालपण हरवता कामा नये, हा विचार शिक्षकांसाठी दिशादर्शक आहे. पंतप्रधान मोदींनी विविध शिक्षकांची मते जाणून घेतली. अलीकडच्या काळात मुलांसह अनेकांचा वाढलेला स्क्रीन टाईम वाढला आहे. तो कमी करून मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे मात्र त्यांच्यामध्ये संवेदनशीलता विकसित झाली पाहिजे, विद्यार्थी घडवणे खूप महत्वाचे आहे कारण ते देश उभारणीतील महत्वाचा घटक आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. हे सांगताना त्यांची विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ जाणवल्याचे त्या म्हणाल्या. 

मुलांना केवळ गुण मिळवून देणारे विद्यार्थी नव्हे तर माणुसकी जपणारे, योग्य-अयोग्य ओळखणारे, आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविणे ही शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भावी पिढीला सक्षम बनविण्याचे काम वर्गखोलीपासूनच सुरू होते, असा विश्वास बच्छाव यांनी व्यक्त केला. मात्र, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या वेगवान युगात एक मोठे आव्हानही आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, विनयशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, माहिती सहज उपलब्ध झाली असली तरी योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याची विवेकबुद्धी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही शिक्षकांची खरी कसोटी असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news