

म्हैसूर : विद्यार्थी व तरुणांना केंद्रस्थानी ठेवून आमचे सरकार अनेक योजना तयार करत असून युवाशक्ती ही देशाचे भविष्य आहे. त्यांचे भविष्य घडवण्यात आपले सरकार कमी पडणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनात म्हैसूरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुमारे १३० वर्षांपूर्वी स्वामी एक तरुण संन्यासी असताना म्हैसूरला आले होते. त्यानिमित्त म्हैसूर येथील रामकृष्ण आश्रमच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद युवजजन आणि सांस्कृतिक केंद्रातील विवेक स्मारक भवनाचे शनिवारी लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले, आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप प्रणाली आहे. भारत सर्वात मोठा मोबाईल निर्यात करणारा देश आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेमुळे सेमीकंडक्टर, एआय, तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू होत आहे.
युवाशक्तीमुळे आपला देश शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. भारतात आयआयटी, आयटी, विद्यापीठे, एमबीबीएस जागा व वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे. आज देशात सुमारे १ लाख ४० हजार एमबीबीएसच्या जागा आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८२३ पर्यंत वाढली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताच्या युवकांना २१ व्या शतकासाठी तयार करत आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या घडीला मुलीदेखील मोठ्या प्रमाणात सैनिक शाळेत प्रवेश घेत आहेत, असेही मोदी म्हणाले.
म्हैसूरबद्दल गौरवोद्गार
म्हैसूर हे भारताच्या प्राचीन सांस्कृतिक ओळखीचे केंद्र आहे. शिवाय ते सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. म्हैसूर दसरा त्याचा वारसा, राजवाडा, संस्कृती, संगीत व साहित्य यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे शहर आहे. म्हैसूरमधील रामकृष्ण आश्रमाची सेवा अजोड आहे.