PM Modi France visit : भारताच्या तरुणांची मानसिकता नवीन आहे, जी संपूर्ण मानवतेचा विचार करते. भारत शाश्वत भविष्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी नवनिर्मिती करत आहे. नाविन्यता ही भारताच्या डीएनएमध्येच आहे. हजारो वर्षांपासून भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञानातील आपल्या योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला आहे," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४ जून) केले. फ्रान्समधील नीस (Nice) येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत 'भारत इनोव्ह्हेट्स'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत जागतिक इनोव्हेशनमधील एक उगवती शक्ती आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक न राहता उपाय (सोल्यूशन्स) पुरवणारा देश बनत आहे. भारत एक जागतिक इनोव्हेशन सोल्यूशन्स हब म्हणून उदयास येत आहे. देश तरुण आणि तळागाळातील परिसंस्थेला पाठबळ देत नाविन्यतेची सांगड सर्वसमावेशकता आणि शाश्वततेशी घालत आहे.
पंतप्रधान मोदींनी भारताच्या तरुणांचे कौतुक केले. तरुण केवळ संकुचित व्यावसायिक हितसंबंधांसाठी काम न करता मानवतेच्या कल्याणासाठी उपाय शोधत आहेत, असे ते म्हणाले. "भारताच्या तरुणांची मानसिकता नवीन आहे, जी संपूर्ण मानवतेचा विचार करते," असे मोदी म्हणाले. भारताच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी 'शाश्वतता' (Sustainability) असून भारत जगासाठी नवनवीन शोध लावत आहे, यावर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भर दिला. भारत गतीने आणि मोठ्या प्रमाणावर (इनोव्हेशन करतो. भारत शाश्वत भविष्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी इनोव्हेशन करतो," असे ते म्हणाले.
भारताच्या ऐतिहासिक वारशाचा हवाला देत मोदी म्हणाले की, इनोव्हेशन हे देशाच्या डीएनएमध्येच आहे. "हजारो वर्षांपासून भारताने वैद्यकशास्त्र, योग, गणित आणि विज्ञानातील आपल्या योगदानातून मानवतेच्या प्रगतीला आकार दिला आहे," असे त्यांनी नमूद केले.
गेल्या १२ वर्षांत त्यांच्या सरकारने देशातील इनोव्हेशन इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. शाळांमध्ये सुरू असलेला 'अटल टिंकरिंग लॅब्स' हा कार्यक्रम तळागाळातील पातळीवर इनोव्हेशन नेण्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यापासून ते इनक्युबेशन नेटवर्क तयार करण्यापर्यंत, स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यापासून ते धोरणात्मक पाठबळ वाढवण्यापर्यंत, आम्ही इनोव्हेशन तळागाळापर्यंत नेऊन एक मजबूत परिसंस्था तयार केली आहे," असे मोदी म्हणाले.
इनोव्हेशनला चालना देण्यासाठी केलेल्या सुधारणांमुळेच भारताची प्रतिमा 'तंत्रज्ञान स्वीकारणारा देश' वरून आता 'तंत्रज्ञान पुरवणारा देश' अशी बदलली आहे, असे स्पष्ट करत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम होत आहे. तुम्हाला येथे १००-१२५ स्टार्टअप्स दिसत असतील. पण भारताकडे अशा २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा पूल आहे. हे सर्व स्टार्टअप्स मिळून भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान देत आहेत," असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी जगभरातील गुंतवणूकदार, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योजकांना तंत्रज्ञानाच्या पुढील लाटेला आकार देण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.'भारत इनोव्ह्हेट्स' हे जगासाठी भारतासोबत जागतिक इनोव्हेशनचे पुढील प्रकरण लिहिण्याचे एक व्यासपीठ आहे, असे सांगत त्यांनी संशोधन, उत्पादन, तंत्रज्ञान विकास आणि दीर्घकालीन भागीदारीमध्ये अधिक सखोल सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली."भारतात या. आमच्यासोबत काम करा. 'डिझाइन इन इंडिया', 'डेव्हलप इन इंडिया' करा आणि जगासाठी उपाय शोधा," असे आवाहनही त्यांनी केले.
भारत आणि फ्रान्समधील मजबूत संबंधांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "कनेक्शन (संपर्क), कन्व्हिक्शन (विश्वास), इनोव्हेशन, इन्स्पिरेशन (प्रेरणा) आणि सामायिक दृष्टीकोन" यावर आधारित दोन्ही देशांचे संबंध आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र येऊन नवीन उपक्रम सुरू केले आहेत, नवीन कल्पना रुजवल्या आहेत आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत," असे सांगून 'भारत इनोव्ह्हेट्स' हे त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला संबोधित करताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताच्या 'मेक इन इंडिया' (Make in India) उपक्रमाला फ्रान्सचा पाठिंबा दर्शवला. या कार्यक्रमांतर्गत फ्रान्सने विविध क्षेत्रांमध्ये भारताबरोबर भागीदारी केल्याचे त्यांनी सांगितले. भारताचा "इनोव्हेशनचा देश" असा गौरव करत मॅक्रॉन म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि क्लायमेट ॲक्शन (हवामान बदल) यांसारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आहे. स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या (SMRs) विकासासह नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या संभाव्यतेवरही त्यांनी भर दिला.