PM Modi Emmanuel Macron Meeting | भारत-फ्रान्स करणार एव्हरेस्टवर भरारी घेऊ शकेल अशा हेलिकॉप्टरची निर्मिती : पंतप्रधान मोदी
PM Modi Emmanuel Macron Meeting
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों मंगळवारी भारत दौऱ्यावर आले असून मुंबईत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी टाटा-एअरबसच्या H-125 हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे ऑनलाईन उद्घाटन केले. या ऐतिहासिक भेटीत दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी' स्तरावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भारतात बनणार एव्हरेस्टवर झेपावणारी हेलिकॉप्टर्स : पंतप्रधान मोदी
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आणि फ्रान्स मिळून आता अशा हेलिकॉप्टरची निर्मिती करतील, जे माउंट एव्हरेस्टसारख्या अतिउंच शिखरांपर्यंत भरारी घेऊ शकेल." मोदींनी फ्रान्सला भारताचा 'स्पेशल पार्टनर' संबोधले. या नव्या धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही देशांचे संबंध केवळ व्यापार किंवा शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता सुरक्षा, तंत्रज्ञान, अंतराळ, सागरी सुरक्षा आणि जागतिक प्रश्नांवर एकत्र काम करण्यापर्यंत विस्तारले आहेत.
सांस्कृतिक संबंधांना उजाळा; फ्रान्समध्ये स्वामी विवेकानंद केंद्र
दोन्ही देशांच्या प्राचीन संस्कृतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, लोथल येथील नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्ससाठी फ्रान्स भारताला सहकार्य करणार आहे.भारतीय संस्कृती फ्रान्समध्ये पोहोचवण्यासाठी तिथे लवकरच 'स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर' सुरू केले जाईल. दोन्ही देशांनी जागतिक स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्याचा संदेश दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमची भागीदारी पारदर्शकता आणि विश्वासावर आधारित - मॅक्रों
आपल्या संबोधनात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांनी भारताने केलेल्या अपूर्व स्वागताबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, "गेल्या आठ वर्षांत इंडो-पॅसिफिक क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी यांसारख्या क्षेत्रांत दोन्ही देशांनी मोठी प्रगती केली आहे. भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश कायद्याचा आदर करणारे असून कोणत्याही क्षेत्रात एकाधिकारशाही नसावी यावर आमचा विश्वास आहे." मॅक्रों यांनी भारत-फ्रान्स संबंधांना 'अद्वितीय' ठरवत हे नाते विश्वास आणि महत्त्वाकांक्षेवर टिकून असल्याचे नमूद केले.

