PM Modi Dussehra speech
नवी दिल्ली: देशाच्या एकता, मान-सन्मान आणि संस्कृतीला धोका पोहोचवणाऱ्या तीन प्रमुख आव्हानांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील आय. पी. एक्सटेंशन येथील डीडीए उत्सव मैदानावर आयोजित दसरा महोत्सवात ते बोलत होते. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर रावणदहन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आणि रामराज्याच्या संकल्पनेवर भर दिला.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशासमोरील तीन मोठ्या आव्हानांचा उल्लेख केला. देशाच्या मान-सन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या शक्ती, समाजात फूट पाडणारे घटक आणि भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारी मानसिकता हेच देशाचे तीन मुख्य शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. या आव्हानांचा बिमोड करण्यासाठी देशात ऐक्य आणि सांस्कृतिक मूल्ये मजबूत ठेवणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
प्रभू श्रीरामांच्या आदर्श तत्त्वांचे स्मरण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, रामराज्य म्हणजे असा कारभार जिथे भेदभाव नसतो, प्रत्येकाला न्याय मिळतो आणि प्रगतीची समान संधी उपलब्ध असते. सत्तेचा मूळ उद्देश हा जनकल्याण आणि गरीब-वंचितांची सेवा हाच असायला हवा, असेही ते म्हणाले.
देशाला स्वतःच्या सामर्थ्यावर आणि संसाधनांवर विश्वास ठेवावा लागेल. 'विकसित भारत' आणि 'आत्मनिर्भर भारत' हे ध्येय गाठण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विजयादशमीचा सण हाच संदेश देतो की, वाईटावर विजय मिळवण्यासाठी धैर्य, सकारात्मक विचार आणि एकजूट आवश्यक आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
रामराज्य म्हणजे अशी शासन प्रणाली, जिथे कोणताही भेदभाव नसतो. जिथे न्यायाचे राज्य असते आणि प्रत्येकाला प्रगतीची समान संधी मिळते.
आपल्या देशात आणि संस्कृतीत हजारो वर्षांपासून प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते. ही श्रद्धा केवळ त्यांनी रावणाचा पराभव केला म्हणून नाही, तर त्यांनी मानवजातीला अजोड असे आदर्श दिले आहेत. आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांनी कधीही सत्य आणि नीतीचा मार्ग सोडला नाही.
प्रभू श्रीरामांचे जीवन आपल्याला शिकवते की, संकट कितीही मोठे असले तरी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. आपण आपले स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि मेहनतीच्या जोरावर संकटांवर मात केली पाहिजे.
आज देशाला याच मंत्राने पुढे जायचे आहे. आपण 'विकसित भारत' आणि 'आत्मनिर्भर भारत' घडवण्याचे संकल्प सोडले आहेत. भारत जेव्हा पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल.