PM Kisan 22nd installment
नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांचे लक्ष २२ व्या हप्त्याकडे लागले असून, 'बजेट २०२६' पूर्वी हा हप्ता जमा होणार का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हे पैसे वर्षातून तीन हप्त्यांमध्ये दिले जातात, ज्यामध्ये प्रत्येक हप्ता २,००० रुपयांचा असतो. आतापर्यंत एकूण २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. योजनेचा पॅटर्न पाहिला तर प्रत्येक हप्ता साधारणपणे चार महिन्यांच्या अंतराने येतो. मागील हप्त्यांची वेळ लक्षात घेता, फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळू शकतो. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९ वा हप्ता जारी करण्यात आला होता. सध्या सरकारने कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. सरकार वार्षिक मिळणारी ६,००० रुपयांची रक्कम वाढवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अधिकृत घोषणेसाठी शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय भाषणाची वाट पाहावी लागेल.
पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी e-KYC करणे अनिवार्य आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. शेतकरी ऑनलाइन ओटीपी द्वारे ई-केवायसी करू शकतात किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक केवायसी देखील करू शकतात.