Patna High Court File Photo
राष्ट्रीय

High Court: कोणत्याही पुराव्याशिवाय केवळ महिलेच्या अंगावर पडल्याचा आरोप म्हणजे बलात्कार नव्हे: उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने एका व्यक्तीची बलात्काराची शिक्षा कमी करून ती अश्लील कृत्य किंवा विनयभंग अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात बदलली आहे.

मोहन कारंडे

High Court

पाटणा: वैद्यकीय अथवा इतर भौतिक पुरावा उपलब्ध नसल्यास, रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलेचे तोंड दाबून तिच्या अंगावर पडण्याच्या आरोपावरून थेट बलात्काराच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीची बलात्काराची शिक्षा कमी करून ती अश्लील कृत्य किंवा विनयभंग अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात बदलली.

न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या खंडपीठाने ८ ऑक्टोबर रोजी मोहम्मद ऐनुल हक याच्या फौजदारी अपील याचिकेवर हा निर्णय दिला असून, मंगळवारी या निकालाची प्रत उपलब्ध झाली.

नेमकं प्रकरण काय?

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, ८ फेब्रुवारी २०१० रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी ऐनुल हक याने एका महिलेच्या झोपडीत प्रवेश केला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपीचा हात बाजूला करून आरडाओरड केल्यावर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसह १५ ते २० ग्रामस्थ तेथे जमले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

खटल्यादरम्यान पीडित महिलेव्यतिरिक्त सर्व साक्षीदार फितूर झाले. तसेच महिलेच्या शरीरावर कोणतीही दुखापत किंवा कपडे फाटल्याचे वैद्यकीय वा वस्तुस्थितीजन्य पुरावे सरकारी पक्षाला न्यायालयात सादर करता आले नाहीत. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जरी पीडित महिलेचा जबाब गृहीत धरला, तरी उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीने अनधिकृत प्रवेश आणि विनयभंग केल्याचे सिद्ध होते; मात्र त्यावरून बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही.

उच्च न्यायालयाने निकाल बदलला

उच्च न्यायालयाने बेगुसराय येथील कनिष्ठ न्यायालयाचा २९ जुलै २०१३ चा निकाल बदलला. कनिष्ठ न्यायालयाने हक याला एका विधवेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावला होता. उच्च न्यायालयाने या निकालात सुधारणा करत आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केले. मात्र, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवत २५,००० रुपयांचा दंड ठोठावला. ही दंडाची रक्कम तीन आठवड्यांच्या आत पीडित महिलेला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT