राष्ट्रीय

HC Adultery Divorce Ruling : जोडीदार 'आपत्तीजनक स्थितीत' आढळल्यास घटस्फो‌ट होतो का? हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

'आपत्तीजनक स्थिती' आणि 'शारीरिक संबंध' यात मोठा फरक

पुढारी वृत्तसेवा

HC Adultery Divorce Ruling : पती किंवा पत्नी ही अन्य व्यक्तीसोबत केवळ "आपत्तीजनक स्थितीत" आढळल्याचा आरोप केला, तरी हिंदू विवाह कायदा, १९५५ अंतर्गत घटस्फोटासाठी आवश्यक असलेला व्यभिचाराचा (Adultery) आधार सिद्ध होत नाही, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

पतीने केले होते पत्‍नीवर आरोप

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, दाम्‍पत्याचा विवाह जुलै २००६ मध्ये झाला असून त्यांना २०१० मध्ये एक मुलगा झाला. पतीने आरोप केला होता की, पत्नीने त्याच्यासोबत क्रूर व्यवहार केला आणि तिचे एकाशी अनैतिक संबंध होते. मार्च २०१३ मध्ये यावरून वाद झाल्यानंतर पत्नीचे वडील आणि इतर नातेवाईक तिला सासरवरून घेऊन गेले. पतीने व्यभिचार आणि क्रूरतेच्या आधारावर पत्नीकडून घटस्फोट मागितला होता, जो कौटुंबिक न्यायालयाने अमान्य केला होता. पतीने या निकालास उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. पत्नीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. अशा प्रकारचे चरित्रहननाचे आरोप करणे हीच पतीकडून झालेली क्रूरता आहे, असा युक्तिवाद केला होता.

'आपत्तीजनक स्थितीत असणे' आणि 'शारीरिक संबंध असणे' दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी

पतीने दाखल केलेल्‍या याचिकेवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती राणा विक्रम सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीटाने स्‍पष्‍ट केले की, हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३(१)(i) नुसार, लग्नानंतर पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीसोबत स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवल्यास तो व्यभिचार मानला जातो आणि तो घटस्फोटाचा आधार ठरू शकतो. पतीने आपल्या पत्नीला तिच्या मेहुण्यासोबत (बहिणीच्या पतीसोबत) आपत्तीजनक स्थितीत पाहिल्याचा आरोप केला होता. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, 'आपत्तीजनक स्थितीत असणे' आणि 'शारीरिक संबंध असणे' या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. या कथित घटनेनंतर पतीने पत्नीविरुद्ध कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवली नव्हती, याकडेही लक्ष वेधत उच्‍च न्‍यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत पतीचे अपील फेटाळून लावले.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या खटल्‍याचा दाखला

व्यभिचार सिद्ध करण्याबाबत न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या 'हरगोविंद सोनी विरुद्ध रामदुलारी' या खटल्याचा दाखला दिला. प्रत्यक्ष पुरावे मिळणे कठीण असल्याने व्यभिचार हा बहुतांश वेळा परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सिद्ध केला जातो. घटस्फोटाचे अन्य आधार संभाव्यतेच्या निकषावर ठरवले जाऊ शकतात, परंतु व्यभिचाराचा आरोप 'निःसंशयपणे' (Beyond reasonable doubt) सिद्ध करावा लागतो, असेही खंडपीठाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

पतीने केलेले क्रूरतेचे आरोप अत्‍यंत मोघम

उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सांगितले की, पतीने केलेले क्रूरतेचे आरोप अत्यंत मोघम आणि अस्पष्ट आहेत. पतीने व्यभिचार आणि क्रूरता हे दोन्ही आधार सिद्ध करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT