pakistan army moving radar system to forward location sialkot
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला आज सात दिवस झाले. या घटनेवर भारताकडून कडक सैन्य कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराकडून भारताच्या कोणत्याही कारवाईपासून वाचण्यासाठी तयारी केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भारताच्या एअरस्ट्राईकला डिटेक्ट करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने आपल्या रडार सिस्टीमला सियालकोट सेक्टरमध्ये तैनात केले आहे.
फिरोजपूरला लागुन असलेल्या परिसरात भारताच्या सैन्य हालचालींची माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अग्रभागी तैनात केले आहे. अलिकडेच, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त ५८ किमी अंतरावर असलेल्या चोर कॅन्टोन्मेंटमध्ये TPS-७७ रडार तैनात केले होते.
दरम्यान, पाकिस्तानने सलग पाचव्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. याला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये निष्पाप २६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर १७ हून अधिकजण जखमी झाले होते. या घटनेत दहशतवाद्यांनी लोकांना टीपून लक्ष्य बनवले होते.
पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने (CCS) सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला. भारताने पहिल्यांदाच इतकी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन मोठी युद्धे झाली आहेत परंतु हा करार यापूर्वी कधीही स्थगित करण्यात आला नव्हता.
कॅबिनेट समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत, परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत ही बंदी कायम राहील.