Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक ४० मिनिटे चालली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा भारताचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत तसे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती. विद्यमान परिस्थितीत लष्कराच्या तयारीची माहिती, इतर तयारीसाठी लागणारा वेळ आणि संसाधने याबद्दलही संरक्षणमंत्र्यांना माहिती देण्यात आली होती. ही माहिती पंतप्रधानांना कळवण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेतली.
पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या भेटीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सैन्याच्या तयारीची सविस्तर माहिती, सैन्याला सीमेवर आपली संसाधने पोहोचवण्यासाठी किती दिवस लागतील याची माहिती तसेच पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी देशाच्या संरक्षण तयारीची माहिती दिली आणि वेगवेगळ्या कारवायांच्या संबंधी तयारीला किती वेळ लागू शकतो, याबाबतचीही माहिती पंतप्रधानांना दिल्याचे समजते. या भेटीनंतर आम्ही कुठल्याही कारवाईसाठी तयार आहोत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्या भेटीपुर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांची एक मोठी बैठक झाली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयारी करत असल्याचे समजते. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाची सज्जता पंतप्रधानांना अवगत करून दिल्याचेही समजते. यापुर्वी नौदलाने क्षेपणास्त्रांची तयारी केली. पाकिस्तानच्या सीमेलगतही महत्वाच्या हालचाली सुरू असून रणगाडे तैनात केले आहेत.
रविवारी संरक्षण मंत्र्यांची सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत चौहान यांनी सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी लष्करी तयारीची माहिती दिली होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला महत्व आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सतत बैठका घेत आहेत. त्यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी भेट घेतली. यानंतर सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत एक बैठकही झाली. संरक्षणमंत्र्यांना भेटण्यापूर्वी, लष्करप्रमुखांनी पहलगामला भेट दिली होती आणि श्रीनगरमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चौकीवर केलेल्या गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल माहिती घेतली होती. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत बैठक घेतली आहे. त्यामुळे सर्व बैठकांनंतर काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.