Pahalgam Latest Updates
श्रीनगर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील क्रौर्य एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आले आहे. माझ्या पतीला वाचवा, असा टाहो फोडताना एक महिला या व्हिडीओत दिसत आहे. सोबतच तिथे आजसुद्धा निरपराध्यांच्या रक्ताने माखलेली जमीन पाहायला मिळते. त्यामुळे तो हल्ला किती भयावह होता, याची जाणीव हे डाग करून देत आहेत.
दहशतवाद्यांनी तुझा धर्म कोणता, असे विचारून पर्यटकांना लक्ष्य केल्याचा दावा केला जात आहे. तथापि, पहलगामच्या ज्या बैसरन पठारावर हा हल्ला झाला तिथेच एक मशीद आहे. त्या मशिदीच्या समोरच दहशतवाद्यांनी रक्तपात घडवून आणला. त्यामुळे दहशतवादाला जात आणि धर्म नसतो, हे यावरून स्पष्ट होते.
हल्ला झाला तेव्हा हॉटेलवाल्यांनी तयार केलेली मॅगी, पर्यटकांसाठी तयार केलेला पातेले भरून केलेला वाफाळता चहा, फोडलेली अंडी आदी साहित्य तिथेच सोडून आपला जीव वाचवला.
पहलगामवासीयांनी शुक्रवारी पर्यटनाच्या ठिकाणी शांतता रॅली काढली. त्यात हिंदू मुस्लिम सीख ईसाई हम आपस मे भाई भाई, हम हिंदुस्तानी है... हिंदुस्तान हमारा है, मासुमों का कत्ल आम बंद करो... बंद करो, अशा घोषणा यावेळी स्थानिकांनी दिल्या. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो, अशा बोलक्या प्रतिक्रिया त्यातील बहुतांश मंडळींनी दिल्या. त्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या होत्या.
पहलगाममध्ये काही दुकानदारांनी शुक्रवारी आपली दुकाने दुपारनंतर उघडली. मात्र, त्यांना अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. आकर्षक शो पिसचे दुकान चालवणारे शौकत अली यांनी सांगितले की, मी येथे गेल्या पंधरा वर्षांपासून दुकान चालवतो. माझ्या दुकानात नेहमीच खूप गर्दी असते. हस्तकलेतून साकारल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री मी करतो. त्यातून संबंधित कलाकारांनाही मोठा रोजगार मिळतो. शिवाय माझाही उदरनिर्वाह होतो. लाखो सैनिक आपल्या रक्षणासाठी आहेत हे खरे असले तरी हल्लेखोर कोठून आले, याचे कोडे मलाही उलगडलेले नाही.
पहलगाम मार्केटमध्ये दानापानी नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर लोक टोकन घेऊन रांगेत उभे असतात. शुक्रवारी तेथे शुकशुकाट जाणवत होता. हॉटेल मालक सांगतात की, ज्यांनी हे हत्याकांड घडवले, त्यांना माफ करून चालणार नाही. आम्ही स्वतःला सावरू. मात्र, जे लोक मारले गेले त्यांना आपण परत कसे आणणार? त्यांच्या या प्रश्नावर निःशब्द होणे हाच एकमेव पर्याय होता.
काश्मिरी शाल महागडी मानली जाते. मात्र हल्ला झाला तेव्हा स्थानिक दुकानदारांनी या सर्व महागड्या शाली तिथेच टाकून पैशांचा विचार न करता आपला जीव वाचवला. हल्ला झाला तेव्हा हॉटेल चालकांनी आपल्या दुकानातील सर्व साहित्य तिथेच सोडले. तसेच बावीस गॅस सिलिंडर जंगलात फेकून दिले. दहशतवादी हल्ल्यात त्यातील एखादा सिलिंडर फुटला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. पर्यटक प्रथमच पॉईंटच्या ठिकाणी
पहलगाम येथे अनेक पॉईंट आहेत. त्यापैकी एक म्हणजे पहलगाम लव्ह पॉईंट. तेथे पश्चिम बंगाल आणि ओडिशातील दोन कुटुंबे सहलीसाठी आल्याचे सुखद दृश्य पाहायला मिळाले. त्यातील काहींनी सांगितले की, आमचे इथे चार दिवस राहण्याचे नियोजन होते, पण सुरक्षेच्या कारणावरून अनेक पॉईंट बंद आहेत. त्यामुळे आम्ही पहलगाम पाहून परत जायचे ठरवले आहे.