Defence Minister Rajnath Singh File photo
राष्ट्रीय

Pahalgam Attack: 'या' कारणामुळे हल्ल्यावेळी पहलगाममध्ये सैनिक नव्हते; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Pahalgam Attack: सरकार गंभीर असल्याचे दाखविण्यासाठी सिंधू जल करार थांबवला...

पुढारी वृत्तसेवा

Pahalgam Attack Why Were There No Soldiers Govt Answers

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी केंद्र सरकारला थेट आणि कठोर प्रश्न विचारले.

बैठकीत विरोधकांचा मुख्य रोख हल्ला ज्या बैसरण या पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागी झाला, त्या ठिकाणी सुरक्षादलांची उपस्थिती का नव्हती यावर होता.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला, आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्यासह अनेकांनी त्याला पाठिंबा दिला. त्यावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.

सर्वपक्षीय बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याआधीच भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही कठोर प्रत्युत्तरात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या.

या उपाययोजनांमध्ये पाकिस्तानशी राजनैतिक संबंध खालच्या स्तरावर नेणे, पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना देशाबाहेर काढणे, 1960 मधील सिंधू नदी पाणी करार थांबवणे, आणि वाघा-अटारी सीमेवरील स्थलांतर बंद करणे यांचा समावेश होता.

हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का नव्हते?

विरोधकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, बैसरण परिसर दरवर्षी जूनमध्ये सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी बंदोबस्ताखाली घेतला जातो. त्यावेळी अधिकृतपणे मार्ग खुले केले जातात आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल तैनात केले जातात.

सरकारच्या म्हणण्यानुसार, स्थानिक टूर ऑपरेटरनी 20 एप्रिलपासूनच पर्यटकांना त्या भागात नेणे सुरू केले होते, जेव्हा यात्रा हंगामासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा अद्याप सक्रिय झालेली नव्हती. स्थानिक प्रशासनालाही पर्यटकांची ही आगाऊ आवक माहिती नव्हती, त्यामुळे सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.

विरोधकांचे इतर प्रश्न

विरोधकांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला होता. भारताकडे पाणी साठवण क्षमता नसताना, सिंधू जल करार का स्थगित करण्यात आला?

त्यावर केंद्र सरकारचे उत्तर होते की, हा निर्णय तात्काळ परिणामासाठी नसून एक प्रतीकात्मक आणि धोरणात्मक संदेश देण्यासाठी होता.

सरकारने स्पष्ट केले, “हा करार थांबवण्यामागचा हेतू म्हणजे सरकार कारवाईसंदर्भात किती गंभीर आहे हे दाखवणे. हा निर्णय एक स्पष्ट संदेश देतो की भविष्यात सरकारची भूमिका काय असेल.”

राजनाथ सिंह यांनी दिली माहिती

बैठकीच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरक्षेच्या एकंदर परिस्थितीचा आढावा दिला. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका यांनी 20 मिनिटांचे सादरीकरण केले, ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याचे तपशील, गुप्तचर माहिती आणि हल्ल्यानंतर उठवलेली पावले यांचा समावेश होता.

या बैठकीस अनेक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्याबरोबरच भाजप अध्यक्ष व राज्यसभेतील नेता जेपी नड्डा, सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस),

सस्मित पात्रा (बीजेडी), श्रीकांत शिंदे (शिवसेना), प्रेमचंद गुप्ता (आरजेडी), तिरुची शिवा (डीएमके) आणि रामगोपाल यादव (एसपी) यांचाही समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT