Pachpadra Refinery Fire: राजस्थानमधील बालोतरा-जोधपूर परिसरातील पचपद्रा रिफायनरीमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर आता उच्चस्तरीय तपासाला वेग आला आहे. या घटनेमुळे केवळ औद्योगिक नुकसानाचाच प्रश्न निर्माण झाला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या आगीमागे काही कटकारस्थान आहे का, याचा शोध घेण्यासाठी अनेक केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. National Investigation Agency (NIA), केंद्रीय गृहमंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाची तांत्रिक टीम आणि इतर तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून सखोल चौकशी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून कोणती संशयास्पद हालचाल झाली का, याचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वी अशा ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अत्यंत दक्ष असतात. त्यामुळे ही घटना सुरक्षेतील त्रुटी मानली जावी का, असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर विशेष नियंत्रण ठेवले जात आहे.
सुमारे 79,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन उभारण्यात आलेली ही मोठी रिफायनरी सुमारे 4,500 एकर क्षेत्रात पसरलेली आहे. येथे हजारो कर्मचारी काम करत असून, आगीत नेमके किती नुकसान झाले आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुख्य उत्पादन युनिटला (क्रूड डिस्टिलेशन युनिट) मोठे नुकसान झाले नसल्यास 1 जुलैपर्यंत उत्पादन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची चौकशी अनेक स्तरांवर सुरू आहे. एकीकडे सुरक्षा यंत्रणा कटकारस्थानाच्या शक्यतेचा तपास करत आहेत, तर दुसरीकडे संबंधित कंपनीकडून अंतर्गत चौकशीही सुरू आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्वतंत्र तांत्रिक तपास करण्याचाही विचार सुरू असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी बीएसएफच्या हेलिकॉप्टरद्वारे तज्ज्ञांची टीम दाखल झाली. त्यांनी रिफायनरी परिसराची पाहणी करत कर्मचाऱ्यांची चौकशी केली आणि पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी तपास करत महत्त्वाची माहिती गोळा केली आहे.
जर या तपासात निष्काळजीपणा किंवा कटकारस्थानाचे ठोस पुरावे समोर आले, तर राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, या आगीमागचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या असून, तपासाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.