PM Modi  file photo
राष्ट्रीय

Operation Sindoor : 'माझ्‍या पतीच्‍या मृत्यूचा बदला घेतला, मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने व्‍यक्‍त केली कृतज्ञता

पुढारी वृत्तसेवा

Operation Sindoor

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. भारताने बुधवारी 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली असून भारताने केलेल्‍या धडक कारवाईत ८ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी असल्याचे वृत आहे. दरम्‍यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने या कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

माझ्‍या संपूर्ण कुटुंबाचा पंतप्रधान मोदींवर विश्‍वास होता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्‍यमुखी पडलेल्‍या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्‍यांना शांतता लाभली असेल. आज ते शांततेत असतील."

२२ एप्रिल रोजी जम्‍मू-काश्‍मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर भ्‍याड दहशतवादी हल्‍ला झाला. यावेळी २६ पर्यटक मृत्‍युमुखी पडले. अखेर १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.

बालाकोट हल्ल्यानंतर ६ वर्षांनी पाकिस्तान पुन्हा हादरला

सहा वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारत कधीही विसरू शकत नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात आपले ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश संतापला होता. प्रत्येक भारतीयाला पाकिस्तानकडून सूड हवा होता, १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची सीमा ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये

भारतीय सैन्याने यशस्वीरित्या लक्ष्य केलेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील बेसमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे. दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी विशेष अचूक शस्त्रे वापरली गेली. तिन्ही सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT