Operation Sindoor
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख इशारा दिला आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांवर मोठा घाव घातला गेला आहे.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केल्यानंतर काही तासांतच माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सोशल मीडियावर अभी पिक्चर बाकी है, अशी पोस्ट शेअर केली आहे. यामुळे पाककडून कुरापत झाल्यास भारताकडून या हल्ल्यापेक्षा भयंकर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय लष्कर आणि वायुदलाने संयुक्त कारवाई करत जैश-ए-मोहम्मद ,लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांशी संबंधित नऊ तळांचा नाश केला. हे सर्व तळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई भारतीय लष्कराची निर्णायक पावले उचलण्याची तयारी दर्शवते. जनरल नरवणे यांचे वक्तव्य या कारवाईच्या पुढील टप्प्याची शक्यता दर्शवते, असे जाणकारांचे मत आहे.
फक्त संरक्षण खर्चाकडे पाहिलं, तरी भारत पाकिस्तानपेक्षा कितीतरी पुढे आहे. भारताचं संरक्षण बजेट पाकिस्तानच्या तुलनेत जवळपास 3 पट अधिक आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान आपल्या पुढील बजेटमध्ये संरक्षण खर्चात 18 टक्के वाढ करणार आहे. त्यानंतरही भारताचं बजेट पाकिस्तानपेक्षा खूप जास्त असेल.
पाकिस्ताननेही भारताशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपला संरक्षण खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 च्या बजेटमध्ये पाकिस्तान 2.5 ट्रिलियन रुपयांचा संरक्षण खर्च प्रस्तावित करत आहे, ज्यात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारताच्या संरक्षण बजेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वित्त वर्ष 2025-26 मध्ये भारताचं डिफेन्स बजेट 6.81 लाख कोटी रुपये इतकं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी अधिक आहे. म्हणजेच, गेल्या चार वर्षांत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढील काळात या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.