

पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने बुधवारी (दि.७) मध्यरात्री पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले केले. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी स्थळांवर २४ एअर स्ट्राईक केले. यानंतर पाकिस्तान लष्कराने सरकारकडे भारताला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व अधिकार देण्याची मागणी केली. यावर पाकिस्तान सरकारने सकारात्मकता दाखवली आहे.
द डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, "बुधवारी भारताने देशातील दहशतवादी छावण्यांवर आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) केलेल्या अचूक हल्ले केले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने बुधवारी (दि.७) त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NDC) बैठक घेतली. सरकारने पाकीस्तानी सशस्त्र दलांना भारतावर पाहिजे ती कारवाई कऱण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी लष्कर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जोरदार प्रत्युत्तर देईल, याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) आज (दि.७) बैठक झाली. यावेळी देशाच्या "स्वसंरक्षणार्थ" पाकिस्तानी लष्कराला त्यांच्या आवडीच्या वेळी, ठिकाणी आणि कोणत्याही पद्धतीने भारताच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे, असे पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारताच्या 'उघड आक्रमणाचा' निषेध करत पाकिस्तानने असा आरोप केला की, भारताने मुद्दाम पाकिस्तानी नागरिक महिला आणि लहान मुलांना 'अकारण आणि अन्यायकारक हल्ले' करून लक्ष्य केले. भारताने मात्र दावा केला आहे की, या कारवाईत दहशतवादी गटांशी संबंधित नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना लक्ष करण्यात आले नसून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या कलम ५१ चा हवाला देत, पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे की, "निरपराध पाकिस्तानी जीवितहानी आणि त्यांच्या सार्वभौमत्वाचे उघड उल्लंघन" केल्याप्रकरणी पाकिस्तानला स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यांनी भारतावर पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या लष्करी कृती "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्पष्टपणे युद्धाचे कृत्य" असल्याचे म्हटले आहे.