Operation Sindoor
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधातील भारताची कठोर भूमिका सुरूच राहणार आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान पोलखोल भारत जागतिक स्तरावर करणार आहे. यासाठी भारताचे पथक दहशतवादा संबंधीचे पाकिस्तान विरोधातील नवे पुरावे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर करणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानची नाचक्की होण्याची शक्यता आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर आता भारत हे नवीन पावले उचलणार आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठबळ देतो याचे नवीन पुरावे घेऊन भारताचे पथक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएनएससीआर १२६७ मंजुरी समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे स्वागत केले आहे. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, संघर्ष कमी करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, असे महासचिवांचे प्रवक्ते फरहान हक म्हणाले.