Operation Sindoor Live File Photo
राष्ट्रीय

Operation Sindoor Live: 'ऑपरेशन सिंदूर' का आणि कसे राबविले, लष्कराने केली भूमिका स्पष्ट

दहशतवाद्यांचा खात्मा आणि पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठीच 'ऑपरेशन सिंदूर'

मोनिका क्षीरसागर

दिल्ली : पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे तपासातून पुढे आले आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान दहशतवाद्यांचा हात असल्याचे ठोस पुरावे भारताकडे आहेत. हल्यामागील हल्लेखोरांची ओळख पटली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठीच भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आल्याचे भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर केलेल्या हल्ल्यांचा व्हिडिओ दाखवून पत्रकार परिषदेला आज (दि.७) सुरूवात करण्यात आली. यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, मुंबईमधील २६/११ हल्लानंतर पहलगाममधील हा सर्वात मोठा हल्ला होता. यामध्ये २६ भारतीय आणि १ नेपाळमधील एक नागरिक मारले गेले. हा हल्ला सर्वात क्रूर होता. लष्कर ए तोयबाच्या TRF दहशतवादी संघटनेनेच हा भ्याड हल्ला केल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. भारतीय लष्कराची संयुक्त पत्रकार परिषद आज (दि.७) पार पडली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची सर्व माहिती सांगितली.

'ऑपरेशन सिंदूर' दहशतवादविरोधातच...

पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, भारताची कारवाई दहशतवादविरोधीच करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठीच 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. भारताने दहशतवादविरोधात आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.

पाकिस्तानने आगळीक केल्यास भारत चोख प्रत्युत्तर देणार; Pakला इशारा

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणतात, "दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या आमच्या गुप्तचर संस्थांनी असे सूचित केले आहे की भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात आणि त्यांना थांबवणे आणि त्यांचा सामना करणे आवश्यक वाटले." यानंतर पाकिस्तानने आगळीक केल्यास भारत चोख प्रत्युत्तर देणार, पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला इशारा देखील देण्यात आला आहे.

TRF ही संयुक्त राष्ट्रामध्ये बंदी असलेली संघटना

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतावाद्याच्या मुद्द्यावर दिशाभूल करतं. TRF ने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.' TRF ही संयुक्त राष्ट्रामध्ये बंदी असलेली संघटना असल्याचेही ते म्हणाले. २५ एप्रिल रोजी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मीडिया रिलीजमधून टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या दबावाकडे दुर्लक्ष करता कामा नये. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत..."

जाणून घ्या 'ऑपरेशन सिंदूर' कसे राबवण्यात आले....

यानंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी 'ऑपरेशन सिंदूर' नेमकं कसे राबवण्यात आले याविषयी सांगितले.

  • बुधवारी मध्यरात्री १. ०५ ते १.३० वाजता हे ऑपरेशन सिंदूर राबण्यात आले.

  • पाकिस्तानमधील सर्जल कॅम्प भागात हल्ला झाला.

  • मध्यरात्री १. ०५ वाजता पहिला एअर स्ट्राईक करण्यात आला.

  • पाकिस्तान आणि पीओजेकेमधील मुंड्रिक आणि इतर दहशतवादी छावण्यांवर अनेक हिट्स दाखवणारे व्हिडिओ सादर करण्यात आले.

  • जिथे दहशतवाद्यांनी प्रक्षिक्षण दिले जात होते. त्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

  • ऑपरेशनसिंदूरचा भाग म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी नियंत्रण रेषेपासून अनुक्रमे ९ किमी आणि १३ किमी अंतरावर असलेल्या बर्नाला येथील मरकज अहले हदीस आणि कोटली येथील मरकज अहले हदीस यांना लक्ष्य केले.

  • भारतीय सशस्त्र दलांनी जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या बहावलपूर, पाकिस्तानमधील मरकज सुभान अल्लाह येथील दहशतवादी स्थळाला लक्ष्य केले.

  • कुठल्याही प्रकारे नागरिक वस्तींवर हल्ला करण्यात आला नाही. त्यामुळे पाकिस्तानधील एकाही नागरिकांचा मृत्यू झाला नसल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सीमेवर अलर्ट

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. हल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT